नेहा कक्कर (Neha Kakkar) बॉलिवूडची लोकप्रिय गायिका. तिच्या गाण्यांनी तरूणाईला अक्षरश: वेड लावलं आहे. पण सध्या नेहा कक्कर सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय. कारण आहे रिमिक्स गाणं. होय, नेहानं फाल्गुनी पाठकच्या ‘मैंने पायल है छनकाई’ या सुपरडुपर हिट गाण्याचं रिमिक्स व्हर्जन (Remix of Maine Payal Hai Chhankai) गायलं. या आठवड्याच्या सुरूवातीला नेहा कक्करचं हे गाणं रिलीज झालं आणि हे गाणं ऐकून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. नेहाने ओरिजनल गाण्याची वाट लावली, अशा प्रतिक्रिया उमटल्या. आता खुद्द फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) हिनेही नेहाच्या या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाली फाल्गुनी?‘मैंने पायल है छनकाई’चं रिमिक्स व्हर्जन मी ऐकलं. पहिली प्रतिक्रिया चांगली नव्हती. मला फक्त उलटी येणंच बाकी होती. गायिकेने इतक्या सुंदर ओरिजनल गाण्याची वाट लावली. ओरिजनल गाण्यातील व्हिडीओत आणि पिक्चराइजेशनम्ये जो काही निष्पाप भाव होता, त्याचा पुरता सत्यानाश केला. रिमिक्स करता तर चांगल्या प्रकारे करा. युवा पिढीपर्यंत पोहोचवू इच्छिता तर मूळ गाण्याची लय बदला. अशा पद्धतीने त्याची वाट लावू नका. माझ्या चाहत्यांनाही रिमिक्स व्हर्जन आवडलेलं नाही. मग मी शांत कशी बसणार? असं फाल्गुनी एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.फाल्गुनी पाठकने इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहाच्या गाण्याचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. हा स्क्रीनशॉट शेअर करत तिने, ‘नेहा कक्कर तू आणखी किती खालच्या पातळीला उतरणार आहे? आमच्या जुन्या क्लासिक गाण्यांची वाट लावणं बंद कर’ या आशयाचं कॅप्शन दिलं होतं. नेहाने दिलं उत्तर
फाल्गुनी पाठकच्या टीकेला आता नेहा कक्करनेही उत्तर दिलं आहे. ‘मी आयुष्यात जे कमावले आहे ते देशातील फार कमी लोकांच्या नशीबात असेल. इतक्या कमी वयात लोकप्रियता, इतकी हिट गाणी, सुपरडुपर हिट टीव्ही शो, वर्ल्ड टूर, लहान मुलांपासून 80-90 वर्षांचे चाहते आणि बरेच काही. पण हे सहजी मिळालेलं नाही. कष्ट, टॅलेंट, कामाची ओढ, सकारात्मक विचार या सर्व गोष्टींच्या आधारावर मला हे सर्व मिळालं आहे. मला देवाने आजपर्यंत जे काही दिले आहे त्यासाठी मी देवाचे आभार मानते. मी देवाची लाडकी आहे आणि त्यासाठी खरच मनापासून आभार, अशा शब्दांत नेहाने फाल्गुनीला उत्तर दिलं आहे. ‘मैंने पायल है छनकाई’ हे मूळ गाणं फाल्गुनी पाठक हिने गायिलं आहे. याच गाण्याचं नेहाने गायलेलं रिमिक्स व्हर्जन 19 सप्टेंबर प्रदर्शित केलं. या गाण्यात नेहासोबत क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि प्रियांक शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या गाण्याला तनिष्क बागचीनं म्यूझिक दिलं आहे.