बॉलिवूडमध्ये (bollywood) आज असंख्य कलाकारांची रेलचेल पाहायला मिळते. यात काही जण प्रचंड स्ट्रगल करुन यशस्वी झाले आहेत. तर, काही जणांना अपार यश मिळाल्यानंतरही ते हालाखीचं जीवन जगत आहेत. यामध्येच सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय अभिनेत्री पूजा डडवाल (pooja dadwal) हिची चर्चा रंगली आहे. एकेकाळी पूजाने इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा दिले. परंतु, त्यानंतर अचानक तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. इतंकच नाही तर तिच्या गंभीर आजारात तिच्या नवऱ्यानेही तिची साथ सोडली. परिणामी, तिच्यावर हालाखीचे दिवस जगायची वेळ आली.
मुंबईत लहानाची मोठी झालेली पूजा डडवालने अनेक सिनेमांत काम केलं. यात 'वीरगती' या सिनेमातून तिने वयाच्या १७ व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात तिने सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही. परंतु,तिला प्रसिद्धी देऊन गेला. या सिनेमानंतर तिने 'सिंदूर की सौगंध', 'इंतकाम' यांसारख्या सिनेमात काम केलं. त्यानंतर तिने तिचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला. छोट्या पडद्यावरही तिने काही निवडक मालिकांमध्ये काम केलं.परंतु, आता ती कलाविश्वापासून दूर झाली असून अत्यंत हालाखीचं जीवन जगत आहे.
बॉलिवूडमध्ये चांगल्या ऑफर्स न मिळाल्यामुळे पूजाने तिचा मोर्चा टीव्हीकडे वळवला होता. परंतु, इथेही तिच्या नशिबी अपयशच आलं. त्यामुळे तिने इंडस्ट्रीला रामराम केला. परंतु, घर चालावं यासाठी तिने लहानमोठी कामं करण्यास सुरुवात केली.
घरकाम करुन करतीये उदरनिर्वाह
अभिनेत्री होऊन प्रसिद्ध, यश मिळवून जीवन जगण्याचं स्वप्न पाहणारी पूजा आज लोकांच्या घरी घरकाम करत आहे. लग्नानंतर पूजा तिच्या नवऱ्यासह गोव्याला शिफ्ट झाली होती. इथे ती नवऱ्यासोबत कॅसिनोही सांभाळत होतं. परंतु, २०१८ मध्ये पूजा आजारी पडली. तिला टीबी झाल्याचं निदान झालं. विशेष म्हणजे तिच्या या आजारी माहिती तिच्या सासरच्या मंडळींना कळल्यानंतर त्यांनीही तिची साथ सोडली. तिच्या नवऱ्याने तिच्यासोबतचं नातं तोडलं आणि तिला मुंबईला एकटं सोडलं.