फॅमिली ऑफ ठाकूरगंज हा चित्रपट १९ जुलैला प्रदर्शित होत असून या चित्रपटात जिमी शेरगिल, माही गिल, सौरभ शुक्ला, सुप्रिया पिळगांवकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज झा आणि प्रिन्स सिंग यांचे असून या चित्रपटाची कथा दिलीप शुक्ला यांनी लिहिली आहे. दिलीप शुक्ला हे नाव सध्या चांगलेच चर्चेत आहे. कारण दबंग ३ या चित्रपटाची कथा देखील त्यांनीच लिहिलेली आहे.
फॅमिली ऑफ ठाकूरगंज या चित्रपटाच्या प्रदर्शनाला काहीच दिवस शिल्लक असताना या चित्रपटाच्या टीममध्ये वाद सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. या चित्रपटाच्या सेटवर या चित्रपटाचे लेखक दिलीप शुक्ला आणि या चित्रपटातील अभिनेते सौरभ शुक्ला यांच्यात काही भांडणं झाली होती. या भांडणामुळेच सौरभ हे कित्येक तास त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्येच बसून होते. अखेरीस चित्रपटाच्या टीमने त्यांची समजून काढल्यानंतर ते चित्रीकरणासाठी आले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेला हा वाद अजूनही या दोघांच्या चांगल्याच लक्षात असल्याचे म्हटले जात आहे.
न्जूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत दिलीप यांनी या वादाबाबत सांगितले आहे, त्यांनी म्हटले आहे की, सौरभ शुक्ला हे खूप चांगले अभिनेते असण्यासोबतच खूप चांगले लेखक आहेत. पण त्यांच्यात खूप जास्त अहंकार आणि इगो आहे. एखादा कलाकार इतर कलाकारांपेक्षा स्वतःला महान समजू लागतो, त्यावेळी टीमसोबत काम करताना त्याचा इगो अनेकवेळा दुखावला जातो. सौरभ शुक्ला यांच्यासोबत देखील हेच होत आहे. त्यांना वाटते की, ते जे करतात तेच योग्य आहे. पण या चित्रपटाचा लेखक म्हणून मला ती व्यक्तिरेखा योग्य वाटत नाही. त्यामुळे आमच्यात क्रिएटिव्ह गोष्टीवरून वाद होतात.
याविषयी पुढे ते सांगतात, मी अनेक वर्षं बॉलिवूडचा भाग असून मी सनी देओल, अमरिश पुरी, सलमान खान यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. पण आजवर कोणत्याच कलाकारासोबत माझा वाद झाला नव्हता. दबंग या चित्रपटाचे आजवरचे सगळेच भाग मी लिहिले आहेत. पण सौरभ शुक्ला हे प्रचंड अहंकारी आहेत. जेव्हा कोणी तुमचा अपमान करते तेव्हा काय करायचे हे तुम्हीच सांगा?