मुंबई – दिग्दर्शक ओम राऊत यांचा आगामी सिनेमा ‘आदिपुरुष’ यामध्ये व्हिलनची भूमिका कोण साकारणार? याबाबत अनेक नावं चर्चेला येत होती. यातील सर्वात चर्चेत असणारं नाव सैफ अली खानची ओम राऊत यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे आदिपुरुष या सिनेमात सैफ अली खान हा लंकेशच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी ओम राऊत यांनी याबाबत सोशल मीडियातून सैफचं नाव जाहीर केले.
काही दिवसांपूर्वीच ओम राऊत यांनी आदिपुरुष या सिनेमाचं पोस्टर रिलीज केले होते. यात सुपरस्टार प्रभास याची मुख्य भूमिका असणार आहे. पौराणिक कथा रामायण यावर हा सिनेमा आधारित आहे. यामध्ये भगवान रामाची भूमिका प्रभास साकारताना दिसणार आहे. एका मुलाखतीत ओम राऊतने सांगितले होते की, जेव्हा त्याने या सिनेमात भगवान रामच्या भूमिकेबाबत विचार केला तेव्हा त्याच्यासमोर केवळ आणि केवळ प्रभासचा चेहरा आला होता. रामाची भूमिका प्रभासपेक्षा चांगली दुसरं कुणी करू शकणार नाही. प्रभास सध्या देशातील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक आहे आणि या भूमिकेसाठी त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये शांती आणि आक्रमकता दोन्हीचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे असं तो म्हणाला.
भूमिकेसाठी खास तयारी
बाहुबली सिनेमात प्रभास एक योद्धा म्हणून समोर आला होता. पण ‘आदिपुरूष’मध्ये त्याची भूमिका थोडी वेगळी आहे. या सिनेमात त्याला एक योद्धा कमी आणि धनुर्धर अधिक दिसायचं आहे. यासाठी प्रभासने एक्सपर्टसोबत बोलणी केली आहे. त्याने शरीरावर कामही सुरू केलंय. काही दिवसात प्रभास धनुर्विद्याही शिकणार आहे.
ओम राऊत यांच्या तान्हाजी सिनेमात सैफ अली खानने उदयभानची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता पुन्हा लंकेशच्या भूमिकेतून सैफ अली खान ‘आदिपुरुष’मध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. याबाबत सैफ अली खानने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला की, मला पुन्हा ओमी दादांसोबत काम करण्यात आनंद वाटतोय, त्याच्याकडे उत्कृष्ट दृष्टीकोन आणि तांत्रिक ज्ञानाची प्रचंड माहिती आहे. मी या प्रोजेक्टचा भाग असल्याने आनंदित आहे. मी प्रभाससोबत सिनेमात काम करण्यास आणि राक्षसी भूमिका साकारण्यास उत्सुक आहे असं त्याने सांगितले.
सीतेच्या भूमिकेत कोण?
ओम राऊतने हे कन्फर्म केलंय की, भगवान रामाची भूमिका प्रभास साकारणार आहे. त्यामुळे सीता, लक्ष्म आणि हनुमानाची भूमिका कोण साकारणार याचे अंदाज बांधले जात आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, ओम राऊतने काही दिवसांपूर्वी स्क्रीप्ट अभिनेत्री कीर्ती सुरेशला ऐकवल्याचे समजते. पण याबाबत कन्फर्म काहीही सांगण्यात आलेले नाही.
कोण आहे ओम राऊत?
‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या सिनेमाद्वारे ओम राऊत यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. ओम राऊत यांचा हा पहिलाच सिनेमा असा काही गाजला की, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर द्विशतक गाठले. साहजिकच, ‘तान्हाजी’ नंतर ओम राऊत नवा कुठला प्रोजेक्ट घेऊन येणार,याबद्दलची सर्वांचीच उत्सुकता वाढली होती. त्यानंतर ओम राऊत ‘आदिपुरुष’ याची घोषणा केली.