Daler Mehndi Arrested: प्रसिद्ध पंजाबी लोकप्रिय गायक दलेर मेहंदी बाबत मोठी बातमी समोर आली आहे. १५ वर्ष जुन्या मानवी तस्करी प्रकरणात त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणी गुरुवारी पटियाला कोर्टात सुनावणी झाली. पंजाबच्या पटियाला कोर्टाने दलेर मेहंदीची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने त्याला अटक करण्यात आली.
दलेर मेहंदी मानवी तस्करी प्रकरणात आढळला दोषी
मानवी तस्करी प्रकरणातील सुनावणी दरम्यान पटियाला कोर्टाने दलेर मेहंदीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. २००३ मधील कबुतरखान्याची ही घटना आहे. या प्रकरणी दलेर मेहंदी आणि त्याच्या भावावर एकूण ३१ गुन्हे दाखल आहेत. पटियाला कोर्टाच्या निकालानंतर दलेर मेहंदीला कोर्टात अटक करण्यात आली.
नक्की काय आहे प्रकरण-
२००३ मध्ये दलेर मेहंदीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेकायदेशीरपणे लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप त्याच्यावर होता. हे करण्यासाठी दलेर मेहंदीने लोकांकडून मोठी रक्कम वसूल केल्याचे सांगण्यात आले. १९९८ ते १९९८ दरम्यान दलेर मेहंदीने सॅन फ्रान्सिस्को आणि न्यू जर्सीमध्ये किमान १० लोकांना बेकायदेशीरपणे पाठवून दिले होते. यानंतर दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही भावांविरुद्ध सुमारे ३० पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या होत्या.
दोन्ही भाऊ लोकांना परदेशात नेण्यासाठी 'पॅसेज मनी' म्हणजेच एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठीची फी च्या नावाखाली १ कोटी रूपये घ्यायचे. परंतु लोकांच्या तक्रारींनुसार, हा करार कधीच पूर्णत्वास गेला नाही. आणि त्यांचे पैसेही परत केले गेले नाहीत. २००६ मध्ये दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील त्यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता. तेथून केस फाईलची कागदपत्रे आणि उताऱ्याचे पैसे जप्त करण्यात आले.