पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत स्वच्छता मोहिमेला देशभरात खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वी संसद परिसरात भाजपाचं स्वच्छता अभियान आपल्याला पाहायला मिळालं. भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह भाजपाच्या दिग्गज मंत्र्यानी संसद परिसरात स्वच्छता मोहीम राबवली होती.
२ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आहे. त्यामुळे संसद परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. हेमा मालिनी आणि केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी हातात झाडू घेऊन संसद परिसर स्वच्छ केला होता. पण या स्वच्छता मोहिमेमुळे हेमा मालिनी यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले होते.
हेमा मालिनी यांनी स्वच्छता मोहिममध्ये भाग घेत असताना ज्या पद्धतीने हातात झाडू पकडला होता, त्यावरून त्यांना ट्रोल करण्यात आले होते. आता या ट्रोलवर हेमा मालिनी यांचे पती धर्मेंद्र यांनीच उत्तर दिले आहे. धर्मेंद्र यांनी ट्विटरवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत ते चक्क म्हशीसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी लाईक आणि कमेंट केले आहेत. पण या व्हिडिओवर कमेंट करताना चक्क एका व्यक्तीने धर्मेंद्र यांना हेमा मालिनी यांच्या या स्वच्छता अभिनयानाविषयी एक प्रश्न विचारला आहे.
हा प्रश्न अतिशय मजेशीर असून त्याने विचारले आहे की, सर, मॅडमने कधी आयुष्यात झाडू हातात घेतला आहे का?
या प्रश्नावर धर्मेंद्र यांनी देखील चक्क उत्तर दिले आहे. त्यांनी उत्तरात म्हटले आहे की, हो... झाडू हातात घेतला आहे... पण तो चित्रपटात... मला हा व्हिडिओ पाहाताना ती वेंधळी वाटत होती. पण स्वच्छतेबाबत मला विचाराल तर मी कचरा काढण्यात पारंगत आहे. कारण मी माझ्या आईला लहानपणी कामात खूप मदत केली आहे. धर्मेंद्र यांनी प्रामाणिकपणे दिलेल्या या उत्तरामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांचे चांगलेच कौतुक होत आहे.