जगभरात छोट्या छोट्या गोष्टींवरून टिवटिव करणारा प्लॅटफॉर्म ट्विटरच्या सीईओ पदाचा जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिला आणि भारतीयांनी मोठा उत्सव साजरा केला. कारण ट्विटरचे नवे सीईओ म्हणून एक अस्सल भारतीय पराग अग्रवाल (Parag Agarwal) यांच्या नावाची घोषणा झाली होती. यानंतर गुगलवर शोध सुरु झाला तो हे पराग अग्रवाल कोण? काय करतात याचा.
शोधाशोध सुरु असताना पराग अग्रवाल आणि बॉलिवुडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचे कनेक्शन जोडले गेले. बालपणीची मैत्री, श्रेयाने अभिनंदनाचे ट्विटही केले. बॉलिवूड गायिका श्रेया घोषालने पराग अग्रवाल यांचे ट्विटरच्या सीईओ पदी नियुक्ती झाल्याबद्दल ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. तिने ट्विटमध्ये लिहिले की, अभिनंदन पराग. मला तुझ्यावर गर्व आहे. आपल्यासाठी मोठा दिवस, या वृत्ताचे सेलिब्रेशन करत आहे. श्रेया घोषाल आणि पराग अग्रवाल हे खूप जुने मित्र आहेत. हा झाला एक किस्सा. दुसरा किस्सा अजून बाकी आहे.
हा आजचा नाही, आजपासून 11 वर्षांपूर्वीचा म्हणजेच 2010 मधला किस्सा आहे. श्रेया घोषाल तेव्हा बॉलिवुडची गायिका बनली होती. तिचे लाखो चाहते होते. पराग अग्रवाल कोणाला माहितही नव्हता. नुकतेच पराग यांनी ट्विटरवर अकाऊंट सुरु केले होते. नया है वह, सारखे. पराग यांच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी श्रेयाचे एक ट्विट धडकले, ''सर्वांना माझा हाय, मला एक बालपणीचा मित्र भेटला. तो जो खाद्यप्रेमी आणि घुमक्कड आहे. स्टॅनफोर्डचा एक हुशार विद्यार्थी आहे. त्याला फॉलो करा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही द्या...'', श्रेया घोषालचे परागसाठीचे हे पहिले ट्विट होते. यानंतर लगेचच परागकडे फॉलोअर्सचा ओघ सुरु झाला.
कोणाला माहिती होते, ना श्रेयाला, ना खुद्द परागला की आज तो त्याच ट्विटरचा सीईओ होईल. अकरा वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीला श्रेयाच्या चाहत्यांनी फॉलो केले होते, तो त्याच मायक्रोब्लॉगिंग साईटचा CEO बनेल. पण आज तो दिवस आला आहे दोघांच्या मैत्रिचा. श्रेयानेच ट्विटरला परागची ओळख करून दिली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.