काल पार पडलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या 14 व्या पर्वासाठीच्या लिलावात क्रिकेटपटूंची चर्चा तर झालीच. पण या लिलावात दोन चेह-यांनी चांगलीच हवा केली. सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरु आहे. हे दोन चेहरे कोण तर शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि जुही चावलाची लेक जान्हवी मेहता. या दोघांचे लिलावादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. विशेषत: आर्यनच्या फोटोंनी तर धुमाकूळ घातला आहे. आर्यनची बॉडी लँग्वेज पाहून, नवीन शाहरूख मिळाल्याचा आनंद चाहते व्यक्त करत आहेत.लिलावादरम्याने आर्यनचे हावभाव, त्याची बॉडी लँग्वेज पाहून शाहरूखची आठवण येते. केसांची स्टाईल आणि अगदी हातात चहाचा मग पकडण्यापासूनची तो अगदी सेम टू सेम ‘शाहरूख’ दिसतोय. शाहरूखच्या चाहत्यांनी आर्यनचे हे फोटो पोस्ट करत, त्याच्यावर प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे.
माझा लिटल शाहरूख. अगदी शाहरूखसारखेच हावभाव, स्टाईल, बॉडी लँग्वेज. माझा हँडसम बेबी, असे एका युजरने लिहिले आहे. एका युजरने ‘बाप तसा, लेक’ असे कॅप्शन देत आर्यनचा लिलावादरम्यानचा व्हिडीओ शेअर केला आहे.
आर्यन बॉलिवूडमध्ये येणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. पण अद्याप तरी त्याच्या बॉलिवूड डेब्यूचा मुहूर्त ठरलेला नाही. ‘लॉयन किंग’मध्ये आर्यनने आपला आवाज दिला होता. तेव्हापासून चाहते त्याच्यावर फिदा आहेत. अर्थात आर्यन कॅमे-याच्या मागे काम करण्यास उत्सुक आहे. चाहत्यांना मात्र त्याला पडद्यावर पाहण्याची घाई झाली आहे.
जान्हवीचीही चर्चा भारी
जुही चावलाच्या लेकीचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. जुहीने स्वत: आर्यन व जान्हवीचा लिलावाच्या टेबलवरचा एकत्र फोटो शेअर केला होता. जुही चावलाची मुलगी असली तरी जान्हवी झगमगाटापासून दूर राहणे पसंत करते. मात्र काल आयपीएल लिलावात ती पहिल्यांदा लाइमलाईटमध्ये आली. अभिनेत्री होण्याची इच्छा नसल्याचे जान्हवीने आधीच स्पष्ट केले आहे. तिला लेखिका व्हायचे आहे.