Join us

Manikarnika Trailer: चा टीजर पाहून भारावले चाहते! कंगना राणौतचे केले तोंडभर कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 1:35 PM

अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने सजलेल्या आणि कंगना राणौतच्या तितक्याच दमदार अ‍ॅक्शनने कंगावर रोमांच उभे करणारा हा टीजर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे.

कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाचा टीजर काही तासांपूर्वी रिलीज झाला. अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने सजलेल्या आणि कंगना राणौतच्या तितक्याच दमदार अ‍ॅक्शनने कंगावर रोमांच उभे करणारा हा टीजर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. हा टीजर पाहिल्यानंतर कंगनाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

टीजरपेक्षा यातील कंगनाच्या अदाकारीचे कौतुक करणा-या प्रतिक्रिया अधिक आहेत. बॉलिवूडची क्वीन पुन्हा एकदा सर्वांना धूळ चारण्यास सज्ज झाली आहे, असे काहींनी लिहिले आहे तर कंगनाच्या या चित्रपटाचे नाव भारतीय चित्रपटांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. 

चाहत्यांच्या या प्रतिक्रिया बघता कंगनाचा हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर धूम करणार, असे दिसतेय.

‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’साठी कंगनाने प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी ती तलवारबाजी शिकली, घोडेस्वारी शिकली़ तिची ही मेहनत टीजरमध्ये स्पष्ट दिसतेय. अखेरच्या टप्प्यात या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुराही तिने सांभाळली आहे. त्यामुळे कंगनाच्या या चित्रपटाचा टीजर अनेकार्थाने खास आहे.

 या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिश यांनी केले आहे. यामध्ये कंगनासोबतच जिशू सेनगुप्ता, सुरेश ओबेरॉय, डॅनी डॅन्झोप्पा, अतुल कुलकर्णी, अंकिता लोखंडे  यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. २५ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीकंगना राणौत