पडद्यावरच्या हसऱ्या चेहऱ्यांमागे काय काय लपलेलं आहे, याचा अंदाजही आपण बांधू शकत नाही. ग्लॅमरच्या झगमगत्या दुनियेत वावरणाऱ्या अनेकांच्या मनातील घुसमत, हृदयात ठसठसणारं दु:ख अनेकदा समोर येत नाही. एकेकाळी मोठा पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्री डेजी इराणी (Daisy Irani) यापैकीच एक. आता इतक्या वर्षानंतर डेजी यांनी त्यांच्या आयुष्याबद्दलचे असे काही खुलासे केलेत की, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
दिग्गज दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर फराह खानची मावशी डेजी इराणी यांनी 1950 मध्ये बाल कलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. आज त्या 70 वर्षांच्या आहेत. याच डेजी इराणी यांच्या वयाच्या 6 व्या वर्षी बलात्कार झाला होता. कोवळ्या वयात त्यांना बेल्टने बेदम मारलं गेलं होतं. ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत खुद्द डेजी यांनी हा धक्कादायक खुलासा केला.
6 व्या वर्षी बलात्कार... त्या म्हणाल्या, मी सहा वर्षाची होते. माझ्यासोबत राहणाऱ्या एका व्यक्तीने माझ्यावर बलात्कार केला. तो माझा गार्डियन होता. तो माझ्यासोबत चेन्नईत ‘हम पंछी एक डाल के’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला होता. एका रात्री त्याने हॉटेलच्या खोलीत माझ्यावर अत्याचार केला. त्याने मला बेल्टने बेदम मारलं आणि कोणाला काही सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी दिली. ती व्यक्ती आज या जगात नाही. त्याचं नाव नजर असं होतं. त्याची चित्रपटसृष्टीतील व्यक्तींसोबत ओळख होती. कुठल्याही परिस्थितीत मी स्टार व्हावं, अशी माझ्या आईची इच्छा होती. मी मराठी चित्रपटातून केली डेब्यू केला होता. पण आजही ती घटना आठवते. त्या गोष्टीचं दु:ख मला आजही होतं. त्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी मी पुन्हा काम करायला लागले. जणू काही घडलंच नाही.
आईला सांगू शकले असते, पण तेव्हा धीर झाला नाही. सुमारे 10 वर्षानंतर माझ्या आईला या घटनेबद्दल कळलं. हे खरं आहे का? एवढंच तिने मला विचारलं. मी हो म्हटलं, तेव्हा तिला स्वत:ची लाज वाटली. ती माझी माफी मागू लागली. तो क्षण खूप हृदय पिळवटून टाकणारा होता, असं डेजी यांनी सांगितलं.
डेजी इराणी यांनी अनेक चित्रपटांत बालकलाकार म्हणून भूमिका केल्या. बंदिश (1955), एक ही रास्ता (1956), नया दौर (1957) जेलर (1958), कैदी नं. 911 (1959) आणि दो उस्ताद (1959) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.