Join us  

मी माझ्या जुळ्या मुलांना गमावलं, 10 वर्षांत खूप काही झालं..., फरदीन खान पहिल्यांदाच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 12:05 PM

Fardeen Khan : 10 वर्षे कुठे गायब होता फरदीन खान? काय होतं बॉलिवूडमधून ब्रेक घेण्याचं खरं कारण?

सुपरस्टार फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान (Fardeen Khan) सिनेमात आला आणि अख्खी तरूणाई त्याच्यावर  फिदा झाली. हा नवा हिरो ‘लंबी रेस का घोडा’ ठरणार असं सगळ्यांनाच तेव्हा वाटलं होतं. पण, अंदाज चुकला. हिट सिनेम्यांपेक्षा फरदीनने फ्लॉप सिनेम्यांची यादीच लांबली आणि बघता बघता फरदीन इंडस्ट्रीत दिसेनासा झाला. गेल्या 10 वर्षांत त्याचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही. एक दशक बॉलिवूडपासून दूर राहण्याचं नेमकं कारण काय होतं? हे आजपर्यंत फरदीनने कधीच सांगितलं नाही. आता पहिल्यांदा त्यानं याबद्दलचा खुलासा केला आहे. मुळात फरदीनने बॉलिवूड सोडण्यामागे त्याची काही खासगी कारणं होती.

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत तो यावर बोलला. ‘मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यामुळे बॉलिवूड सोडलं, हे खरं आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मला वेळ हवा होता. तो काळ खूप कठीण होता. त्यांच्या निधनानंतर काही महिन्यांनी 2009 मध्ये मला माझ्या प्रकृतीची चिंता सतावू लागली होती. अशात मी व माझी पत्नी नताशा आम्ही फॅमिली वाढवण्याचाही विचार करत होतो. अनेक रिस्क होत्या. त्यामुळे आम्ही आयव्हीएफद्वारे मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. पण मुंबईच्या डॉक्टरांकडून आम्हाला खूप वाईट अनुभव आला. त्यामुळे मी व नताशा 2011 मध्ये लंडनला शिफ्ट झालोत.आम्हाला जुळी मुलं होणार होती. पण 6 महिन्यांत आम्ही त्यांना गमावलं. तो काळ आमच्यासाठी अतिशय कठीण होता. पुढे आम्हाला मुलगी झाली. आम्हाला आणखी एक मुलं हवं होतं. 2017 मध्ये आमच्या मुलाचा जन्म झाला. यादरम्यान मी भारत आणि लंडनच्या वाऱ्या करत होतो. पण माझं मनं लंडनमध्ये पत्नी व मुलांजवळ होतं. त्यामुळे मी अ‍ॅक्टिंग करिअरवर लक्ष देऊ शकलो नाही, असं फरदीनने सांगितलं.

10 वर्षानंतर होतेय वापसी10 वर्षानंतर फरदीन कमबॅक करतोय. ‘विस्फोट’ या सिनेमात तो दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रितेश देशमुख, प्रिया बापट व क्रिस्टल डिसूजा मुख्य भूमिकेत आहेत. कुकी गुलाटी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

1998 साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाद्वारे फरदीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. फरदीनच्या वडिलांनी म्हणजे फिरोज खान यांनीच हा चित्रपट प्रोड्यूस केला होता. पण हा चित्रपट दणकून आपटला. अगदी पदार्पणालाच फरदीनच्या वाट्याला फ्लॉप सिनेमा आला. यानंतर यशाची चव चाखायला त्याला 2000 सालची वाट पाहावी लागली. 2000 साली रिलीज झालेल्या ‘जंगल’ या सिनेमाने फरदीनला ओळख दिली. या चित्रपटातील फरदीनच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा हिट झाला. पण यानंतर 2001 साल उगवता उगवता फरदीन एका वादात सापडला.

होय, 2001 साली फरदीनला कोकेन खरेदी करताना रंगेहात पकडलं गेलं. यानंतर त्याला अटकही झाली. पाठोपाठ रिहॅब सेंटरमध्ये त्याची रवानगी झाली. या प्रकरणाने अनेक वर्षे फरदीनचा पाठपुरावा केला. अखेर 2012 साली त्याची या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली. लव्ह के लिए कुछ भी करेगा, ओम जय जगदीश, हे बेबी, ऑल द बेस्ट अशा अनेक सिनेमात फरदीनने काम केलं. पण अचानक   त्याने चित्रपटांतून ब्रेक घेतला. यानंतर अनेक वर्षे तो बॉलिवूडमधून गायब झाला. यानंतर तो पुन्हा दिसला तेव्हा लोकांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना. होय, वाढलेल्या वजनामुळे त्याला ओळखताही येईना.

टॅग्स :फरदीन खानबॉलिवूड