अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि गायक अशा विविधांगी भूमिका पार पाडणारा अभिनेता म्हणजे फरहान अख्तर (farhan akhtar). आपल्या कलागुणांमुळे फरहानने कलाविश्वात त्याचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. 'दिल चाहता है', 'रॉक ऑन', 'भाग मिल्खा भाग','वजीर', 'दिल धडकने दो', असे फरहानचे कितीतरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले आहेत. विशेष म्हणजे आज कलाविश्वात तगडं मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत फरहानचं नाव घेतलं जातं. परंतु, तरीदेखील 'भाग मिल्खा भाग' (bhag milkha bhag) या चित्रपटासाठी त्याने केवळ ११ रुपये मानधन घेतल्याचं सांगण्यात येतं.
धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित भाग मिल्खा भाग हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटाने ३१ कोटींपेक्षा जास्त कमाई केली. परंतु, या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या फरहान अख्तरने केवळ ११ रुपयेच मानधन घेतल्याचं सांगण्यात येतं. मात्र, त्यामागेदेखील एक खास कारण असल्याचं म्हटलं जातं.
'या चित्रपटासाठी तू किती मानधन घेतलं'? असा प्रश्न फरहानला विचारण्यात आला होता. त्यावेळी "मी ११. ४ सेकंदसाठी १०० मीटर चार्ज केला आहे. ही वेळ त्या प्रसिद्ध असलेल्या रेसची वेळ होती. ज्यात मिल्खा सिंग केवळ २ मिलीसेकंदमुळे ऑलिंम्पिक विनर होता होता राहिले", असं फरहान म्हणाला होता.
दरम्यान, या चित्रपटासाठी फरहान अख्तर आणि सोनम कपूरने ११ रुपये मानधन घेतलं होतं. तर प्रकाश राज यांनी कोणतंही मानधन घेतलं नव्हतं. तसंच मिल्खा सिंग यांनीदेखील फक्त १ रुपया फी घेतली होती.