2006 साली आलेला फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन' (Don) सिनेमाने शाहरुख खानचं (Shahrukh Khan) नशीबच उजळलं. रोमँटिक हिरोची इमेज तोडून शाहरुखला 'डॉन'ही नवी ओळख मिळाली. 'डॉन' आणि 'डॉन 2' दोन्ही चित्रपट सुपरहिट झाले. आता फरहान डॉन 3 ची तयारी करत आहे. मात्र यामध्ये शाहरुख नाही तर रणवीर सिंह झळकणार आहे. दरम्यान फरहान अख्तरने (Farhan Akhtar) नुकताच खुलासा केला की 'डॉन'साठी त्याने आधी हृतिक रोशनला (Hrithik Roshan) ऑफर दिली होती. मग शाहरुखची एन्ट्री कशी झाली?
एका मुलाखतीत फरहान अख्तर म्हणाला, "लक्ष्य सिनेमावेळी हृतिक आणि माझ्यात छान मैत्री झाली होती. तेव्हाच मी त्याला डॉन सिनेमा बनवणार असल्याची कल्पना दिली. मी सध्या स्क्रीप्टवर काम करत असून सगळं झाल्यावर तुला सांगेन असं मी त्याला सांगितलं. तोही मला हो म्हणाला. पण जेव्हा मी प्रत्यक्षात डॉन ची स्क्रीप्ट लिहित होतो तेव्हा माझ्या डोक्यात सतत शाहरुख खानच येत होता. शाहरुखला मी सतत एखाद्या पार्टी किंवा कॉमन फ्रेंड्ससोबत पाहत होतो. त्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व, बौद्धिक चातुर्य, सेन्स ऑफ ह्युमर, स्वत:चीच खेचणं हे सगळं मी पाहिलं. डॉन ची स्क्रीप्ट लिहिताना मला वाटलं की ही भूमिकेसाठी शाहरुखच योग्य आहे."
फरहान पुढे म्हणाला, "मी हृतिकला आधीच डॉन साठी विचारलं होतं. त्यामुळे मी हृतिकला फोन केला आणि म्हणालो की जसाजसा मी स्क्रीप्ट लिहित आहे मला वाटतं मी यासाठी शाहरुखला विचारावं. यावर हृतिक म्हणाला, माझी काळजी करु नको तुला जर तो योग्य वाटत असेल तर त्याला फोन करुन विचार. हृतिकचा हा खरोखर मोठेपणा होता."
अशा प्रकारे 'डॉन' शाहरुखच्या खात्यात आला. तरी 'डॉन 2' मध्ये हृतिक रोशनचा कॅमिओ पाहायला मिळाला होता. हृतिकने नंतर फरहान अख्तरसोबत 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्येही काम केलं. हृतिक रोशन आणि शाहरुख खान यांनी एकत्र 'कभी खुशी कभी गम' सिनेमात काम केलं होतं.