Join us

फरहान अख्तरच्या '१२० बहादूर'ची पहिली झलक, दिसणार भारतीय सैन्याच्या 'या' युद्धाची रोमांचक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 2:08 PM

फरहान अख्तरच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली असून भारतीय सैन्याची रोमांचक कहाणी सिनेमात दिसणार आहे (farhan akhtar, 120 bahadur)

'भाग मिल्खा भाग', 'शादी के साईड इफेक्ट्स', 'दिल धडकने दो' अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलेला बॉलिवूडमधील चतुरस्त्र अभिनेता म्हणजे फरहान अख्तर.फरहान अख्तर केवळ अभिनेताच नाही तर त्याने 'डॉन', 'दिल चाहता है' अशा सिनेमांचं दिग्दर्शन करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. आज नुकतीच फरहान अख्तरच्या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. '१२० बहादुर' असं या सिनेमाचं नाव असून फरहान अख्तरच्या भूमिकेचाही उलगडा झालाय. 

फरहान साकारणार ही भूमिका

फरहान अख्तरच्या आगामी '१२० बहादुर' सिनेमाचं मोशन पोस्टर आज रिलीज झालं. या पोस्टरमध्ये पहिल्यांदा आर्मीच्या गणवेशात फरहान पाहायला मिळतो. पुढे आणखी एका पोस्टरमध्ये फरहानच्या चेहऱ्याची झलक दिसत असून त्याच्या भूमिकेचा उलगडा होता. फरहान या सिनेमात वीरचक्र सन्मानित मेजर शैतान सिंग पीव्हीसी यांची भूमिका साकारणार आहे. फरहान या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच लढवय्या आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

काय असणार सिनेमाची कहाणी?

'१२० बहादुर'चं पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये सिनेमाची कथा उलगडण्यात आलीय. १८ नोव्हेंबर १९६२. भारत-चीनमध्ये झालेलं रेजांग लाचं युद्ध. आपल्या वीर सैनिकांची अद्वितीय वीरता, साहस आणि निःस्वार्थतेची ही कहाणी आहे. भारतीय सैन्याने ही अद्वितीय कहाणी मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि पाठिंबा दिला, त्यासाठी आम्ही ऋणी आहोत." रजनीश घई या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. सिनेमाची रिलीज डेट अजून जाहीर झाली नाही.

टॅग्स :फरहान अख्तरबॉलिवूडभारतचीन