फरहान अख्तरने दिग्दर्शक म्हणून त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. पण आज त्याने एक निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता आणि गायक अशी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. फरहान अख्तर प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर आणि अभिनेत्री हनी इराणी यांचा मुलगा असून त्याने आज बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले आहे. त्याचा आज म्हणजेच 9 जानेवारीला वाढदिवस असून त्याचा यंदाचा वाढदिवस हा त्याच्यासाठी खूप खास आहे. कारण फरहान अभिनेत्री शिबानी दांडेकरच्या प्रेमात पडला असून त्यानेच ही गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे.
बॉलिवूडमध्ये असे अनेकवेळा झाले आहे की, सुरुवातीला एखादा सिनेमा वेगळ्याच अभिनेता किंवा अभिनेत्रीला ऑफर केला जातो आणि नंतर तो हिट झाल्याने आपण का नाकारला याची सल त्यांना आयुष्यभर राहते.
अभिनेता, दिग्दर्शक आणि सिंगर फरहान अख्तरसोबत सुद्धा असेच काहीसे घडले होते. फरहानने एक सुपरहिट सिनेमा सोडला होता आणि त्याचे दु:ख त्याला आजही आहे. हा सिनेमा होता राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला 'रंग दे बसंती'. राकेश ओमप्रकाश मेहरा या सिनेमाबाबत बोलताना म्हणाले होते की, मला नेहमीच फरहानचा अभिनय आवडला आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे की, मी 'रंग दे बसंती'ची ऑफर त्याला दिली होती. तो एकदम हैराण झाला होता कारण त्याने त्याआधी कधीच कॅमेरा फेस केला नव्हता. त्यावेळी त्याने 'दिल चाहता है' दिग्दर्शित केला होता आणि 'लक्ष्य'चे तो दिग्दर्शन करत होता. फरहानने हा सिनेमा नाकारण्यामागचे कारण देखील सांगितले होते. तो म्हणाला होता की, ''त्यावेळी मला अभिनय करण्यात रस नव्हता. मात्र आता मला या गोष्टीची खंत आहे की मी तो सिनेमा का नाकारला.''
फरहान अख्तरने 'रॉक ऑन' सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. त्यानंतर राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या भाग मिल्खा भागमध्ये फरहान दिसला होता आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट देखील झाला होता.