Join us  

फवाद खान अन् माहिराचा ब्लॉकबस्टर सिनेमा गांधी जयंतीला भारतात होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 6:31 PM

तब्बल एका दशकानंतर भारतीय चित्रपटगृहात पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

पाकिस्तानी कलाकार फवाद खानपासून (Fawad Khan) माहिरा खान (Mahira Khan) आणि अली जफरपर्यंत असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांचा मोठा चाहतावर्ग भारतात आहे.  2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. गेल्या काही काळात अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय चित्रपटसृष्टीत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पाकिस्तानी कलाकारांना भारतीय सिनेमात पुन्हा काम करण्याची कधी संधी मिळेल, हे सांगता येत नाही. पण, अभिनेता फवाद खान आणि अभिनेत्री माहिरा खानच्या भारतातील चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिराच्या भारतीय चाहत्यांचे एक स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. भारतीय चाहते पुन्हा एकदा फवाद खान आणि माहिरा खान यांचा सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट भारतातील चित्रपटगृहात पाहू शकणार आहे. तब्बल एका दशकानंतर भारतीय चित्रपटगृहात पाकिस्तानी (Pakistani movie) चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 2022 साली प्रदर्शित झालेला पाकिस्तानी चित्रपट 'द लीजेंड ऑफ मौला जट' आता भारतात प्रदर्शित होणार आहे. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बिलाल लश्री दिग्दर्शित ॲक्शन थ्रिलर चित्रपटात फवाद खान आणि माहिरा खान व्यतिरिक्त सायमा बलोच आणि हुमैमा मलिक यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.

फवाद खानच्या 'द लिजेंड ऑफ मौला जट' या चित्रपटाचे बजेट जवळपास 45 कोटी रुपये होते. परंतु या चित्रपटाने जगभरात 274.7 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये एकूण 115 कोटींची कमाई केली होती आणि इतर देशांमध्ये या चित्रपटाने 160 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. जगभरात एवढी कमाई करणारा हा पहिला पाकिस्तानी चित्रपट आहे. 

टॅग्स :फवाद खानपाकिस्तानभारतसेलिब्रिटी