Join us  

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचे 8 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक, वाणी कपूरसोबत झळकणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 6:32 PM

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची भारतात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान हा तब्बल ८ वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. फवाद खानची भारतात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्याच्या कमबॅकची बातमी कळताच चाहते खूश झाले आहेत. 'अबीर गुलाल' असे त्याच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे नाव आहे. यामध्ये तो अभिनेत्री वाणी कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

फवाद खान आणि वाणी कपूर यांच्या 'अबीर गुलाल' या चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाले आहे. याचे दिग्दर्शन आरती एस बागरी करत आहेत. ही सिनेमाची कथा दोन लोकांची आहे, जे नकळत एकमेकांना मदत करतात आणि प्रेमात पडतात. विवेक बी अग्रवाल, अवंतिका हरी आणि राकेश सिप्पी यांनी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 

पाकिस्तानी कलाकार 8 वर्षांपासून भारतीय चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. 2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे फवाद तब्बल 8 वर्षे भारतीय चित्रपटसृष्टीपासून दूर होता.

फवाद खानने 2014 मध्ये 'खूबसूरत' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यात सोनम कपूरसोबत झळकला होता. यानंतर तो 'कपूर अँड सन्स'मध्ये दिसला. तर 2016 मध्ये 'ए दिल है मुश्किल'मध्ये फवादचा कॅमिओ होता. फवादच्या  'द लीजेंड ऑफ मौला जट'चे जगभरातून खूप कौतुक झाले, पण विरोधामुळे तो भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हा चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली नाही.

टॅग्स :फवाद खानबॉलिवूडवाणी कपूर