पाकिस्तानचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता फवाद खान कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. होय, फवादच्या पत्नीने आपल्या मुलीला पोलिओ ड्रॉप पाजण्यास नकार दिला. यानंतर लाहोर पोलिसांनी पोलिओ टीमच्या लेखी तक्रारीनंतर फवादविरोधात एफआयआर दाखल केला.पोलिओ टीम फवाद खानच्या मुलीला पोलिओ ड्रॉप पाजण्यासाठी गेली होती. मात्र फवादच्या पत्नीने आपल्या मुलीला पोलिओ ड्राप देण्यास नकार दिला. यानंतर पोलिओ टीमने थेट पोलिसांत जात,यासंदर्भातील लेखी तक्रार नोंदवली. फवादच्या पत्नीने असभ्य वर्तन केल्याचा आरोपही या टीमने केला. हा प्रकार घडला तेव्हा फवाद घरात नव्हता. पाकिस्तान सुपर लीगसाठी तो दुबईत होता. पोलिसांनी पोलिओ टीमच्या तक्रारीची गंभीर दखल घेत, घरप्रमुख या नात्याने फवादविरोधात गुन्हा दाखल केला. फवादच्या पत्नीने आपल्या मुलीस पोलिओ ड्रॉप पाजण्यास नकार दिला. टीमशी असभ्य वर्तन केले. तिच्या ड्रायव्हरनेही टीमसोबत गैरवर्तन केले, असे तक्रारीत म्हटले आहे.
प्रशासनाने सांगितले की, फवादच्या पत्नीने मुलीला पोलिओ ड्रॉप न देण्यामागे कुठलेही ठोस कारण दिले नाही. एकतर ती पोलिओ ड्रॉपला गंभीरपणे घेत नव्हती किंवा सेलिब्रिटी असल्यामुळे पोलिओ कर्मचाऱ्यांचा अनादर करत होती. हा सगळा प्रकार निंदनीय आहे.
या सगळ्या प्रकारानंतर पाकिस्तानी पंतप्रधानांच्या पोलिओ टास्कफोर्सचे प्रवक्ता बाबर बिनने टिष्ट्वट करून, फवादला मुलीला पोलिओ लसीकरण करण्याचे आवाहन केले. फवाद आमच्या देशाची शान आहे. त्याला विनंती करतो की, त्याने मुलीला पोलिओ लसीकरण करण्याची परवानगी द्यावी. लाहोरमध्ये गत आठवड्यात पोलिओचे एक प्रकरण समोर आले. आम्हाला मुलांची सुरक्षा करायला हवी, असे त्यांनी या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. पोलिओने प्रभावित असलेल्या जगभरातील तीन देशांत पाकिस्तानचा समावेश आहे, हे विशेष.