गेल्या काही दिवसांपासून 'द लीजेंड ऑफ मौला जट' या पाकिस्तानी सिनेमाची प्रचंड चर्चा आहे. फवाद खान आणि माहिरा खान मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. २०२२ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा दोन वर्षांनी भारतात प्रदर्शित होणार होता. पण, आता या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे.
झी स्टुडियोजने 'द लीजेंड ऑफ मौला जट' सिनेमा २ ऑक्टोबरला भारतात प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं होतं. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही केली होती. त्यामुळे फवाद खान आणि माहिरा खानचे चाहते उत्सुक होते. पण, आता मात्र भारतात या सिनेमावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे 'द लीजेंड ऑफ मौला जट' सिनेमा भारतात प्रदर्शित होणार नाहीये. एएनआयने याबाबत ट्वीट केलं आहे. "'द लीजेंड ऑफ मौला जट' हा पाकिस्तानी सिनेमा भारतातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार नाही. २०१९ पासून पाकिस्तानात भारतीय सिनेमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे", असं या ट्वीटमध्ये म्हटलं गेलं आहे.
बिलाल लश्री दिग्दर्शित ॲक्शन थ्रिलर चित्रपटात फवाद खान आणि माहिरा खान व्यतिरिक्त सायमा बलोच आणि हुमैमा मलिक यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. फवाद खानच्या 'द लिजेंड ऑफ मौला जट' या चित्रपटाचे बजेट जवळपास 45 कोटी रुपये होते. परंतु या चित्रपटाने जगभरात 274.7 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये एकूण 115 कोटींची कमाई केली होती आणि इतर देशांमध्ये या चित्रपटाने 160 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. जगभरात एवढी कमाई करणारा हा पहिला पाकिस्तानी चित्रपट आहे.