Join us

‘मिस इंडिया रनरअप’चा मुकूट घालून पित्याच्या ऑटोतून निघाली मान्या सिंहची रॅली, पाहून प्रत्येकजण झाला भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 13:56 IST

Femina Miss India 2020 : मान्याने ऑटो चालवून रात्रंदिवस घाम गाळणा-या पित्याला प्रेमाने मिठी मारली, रोज झिजणा-या आईचे आशीर्वाद घेतले तो क्षण कॅमे-यांनी कैद केला.

ठळक मुद्देरिक्षाचे भाडे वाचवण्यासाठी तासन् तास चालणारी, आईची दागिणे गहाण ठेवून शाळेची फी भरणारी हीच मान्या मिस इंडियाच्या मंचावर पोहोचली आणि जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे तिने सिद्ध केले. 

व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया 2020मध्ये उपविजेता ठरलेल्या मान्या सिंहचे मिस- इंडिया होण्याचे स्वप्न भलेही भंगले. पण मान्या सिंहच्या संघर्षाची कहाणी ऐकून अनेकांचे डोळे पाणावलेत. तिचा खडतर प्रवास आणि प्रबळ इच्छाशक्तीचे प्रत्येकाने कौतुक केले. इच्छाशक्ती असली की माणूस काहीही करू शकतो, हे संपूर्ण जगाला तिने दाखवून दिले. मिस इंडिया स्पर्धेत मान्या फर्स्ट रनरअप ठरली. मान्या कोण तर साध्या ऑटोरिक्षा चालकाची लेक़ पण स्वप्न आणि ती पूर्ण करण्याची जिद्द अफाट. 14 वर्षांची असताना मान्या घरातून पळाली. दिवसा अभ्यास, संध्याकाळी भांडी घासून आणि रात्री कॉल सेंटरमध्ये काम करून तगली. रिक्षाचे भाडे वाचवण्यासाठी तासन् तास चालणारी, आईची दागिणे गहाण ठेवून शाळेची फी भरणारी हीच मान्या मिस इंडियाच्या मंचावर पोहोचली आणि जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे तिने सिद्ध केले. 

मंगळवारी मान्याच्या वडिलांनी ऑटोतून तिची रॅली काढली. यावेळचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वडिलांच्या चेह-यावरचा लेकीबद्दलचा अभिमान आणि माऊलीच्या डोळ्यांतील अश्रू यावेळी सर्वांनी पाहिले.

श्याम नारायण ठाकूर मार्गापासून कांदीवली ईस्ट मुंबईपर्यंत ही रॅली काढली गेली. यावेळी मान्याच्या डोक्यावर मिस इंडिया रनर अपचा मुकूट होता. मान्याने ऑटो चालवून रात्रंदिवस घाम गाळणा-या पित्याला प्रेमाने मिठी मारली, रोज झिजणा-या आईचे आशीर्वाद घेतले तो क्षण कॅमे-यांनी कैद केला.

मान्या म्हणाली...यावेळी मान्याने पुन्हा एकदा तिची संघर्षकथा सांगितली. माझे रक्त, माझा घाम आणि माझ्या डोळ्यांतील अश्रू हेच माझ्या आत्म्यासाठी अन्न ठरले आणि मी स्वप्न पाहण्याची हिंमत करू शकले. खूप कमी वयात मी नोकरी करू लागले. आईवडिलांनी मोठ्या कष्टाने मला शिकवले. मी फेमिना मिस इंडियाच्या मंचावर होते, याचा आज त्यांना अभिमान आहे. मी आज जी काही आहे, त्यांच्यामुळे आहे, असे मान्या म्हणाली.

टॅग्स :मिस इंडिया