स्मिता पाटील हे मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला पडलेले एक सुंदर स्वप्न. स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी जन्म पुण्यात झाला. एका सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरात जन्माला आलेल्या स्मिता पाटील यांच्यावरही बालपणापासून समाजकारणाचे धडे कोरले गेले. अन्याय, अत्याचार यांच्या विरोधात त्या पेटून उठायच्या. दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून त्यांनी करियरची सुरुवात केली. 'चरणदास चोर' या सिनेमातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यावेळेला श्याम बेनेगल अभिनेत्रीच्या शोधात होते आणि त्यांचं लक्ष स्मिता पाटील यांच्यावर गेले. या पहिल्याच चित्रपटाने स्मिता पाटील यांना स्टार बनवले. त्यानंतर मात्र स्मिता पाटील यांनी मागे वळून पाहिलं नाही.तो काळ समांतर सिनेमांचा होता. विसाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये आलेल्या स्मिता यांनी ७५ चित्रपट केलेत.
स्मिता पाटील यांचे खासगी आयुष्य बरेच वादळी राहिले. अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत असताना स्मिता यांना अनेकांचा रोष सहन करावा लागला. त्यावेळी राज बब्बर विवाहित होते. त्यांना दोन मुले होती. विवाहित राज बब्बर स्मिताच्या प्रेमात आकंठ बुडाले. स्मिताही त्यांच्यासोबत राहू लागल्या. पण खुद्द स्मिताच्या आईला तिचे हे नातं मान्य नव्हते. पण आईचे एक न ऐकता स्मिता यांनी राज यांच्यासोबत विवाह केला. मीडियाने त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. ‘स्त्रीवादी’ स्मिता पाटील यांना घर फोडणारी महिला ठरवण्यात आले. सर्व विघ्न पार करून दोघांनी विवाह केला; पण मनावर झालेले घाव परत कधीच भरले गेले नाही. सेटवर नेहमी आनंदी, उत्साही राहणारी स्मिता आता शांत आणि उदास झाली होती. राज बब्बरशी असलेले लग्न मोडून बाहेर पडण्याचाही त्यांचा विचार होता. पण नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते. १३ डिसेंबर १९८६ रोजी राज व स्मिता यांचा मुलगा प्रतिक याचा जन्म झाला. पण प्रतिकच्या जन्मानंतर अवघ्या सहा तासांत स्मिता यांनी जगाचा निरोप घेतला.