दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम यांना चेन्नईच्या एका रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना ताबडतोब रूग्णालयात हलवण्यात आले. तूर्तास मणिरत्नम डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळतेय.दरम्यान मणिरत्नम नियमित वैद्यकीय चाचण्यांसाठी रूग्णालयात भरती झाल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. २००४ मध्ये हिंदी चित्रपट ‘युवा’च्या शूटींगदरम्यान मणिरत्नम यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर २००९ आणि २०१५ मध्येही त्यांना प्रकृतीचा त्रास झाला होता. मात्र त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली होती. अलीकडे मणिरत्नम यांनी ‘चेक्का चिवंथा वनम’ या चित्रपटाचे शूटींग पूर्ण केले. गुरूवारी या चित्रपटाच्या एडिटींगमध्ये व्यस्त असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले.मणिरत्नम यांचा ‘चेक्का चिवंथा वनम’ हस चित्रपट औद्योगिक प्रदुषणावर आधारित आहे. या चित्रपटात सिंबु, विजय सेतुपती, अरविंद स्वामी, अरूण विजय, अदिती राव हैदरी मुख्य भूमिकेत आहेत. मणिरत्नम यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘रोजा’, ‘बॉम्बे’,‘दिल से’,‘रावन’,‘युवा’,‘गुरू’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले. १९८८ मध्ये मणिरत्नम यांनी तामिळ अभिनेत्री सुहासिनीसोबत लग्न केले. त्यांचा एक मुलगा आहे. ऐश्वर्या राय, आर.माधवन आणि संगीतकार ए.आर. रहमान यांना मणिरत्नम यांनीच प्रथम चित्रपटसृष्टीत लाँच केले आहे.
ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम रूग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 6:14 PM