'हम दिल दे चुके सनम','रामलीला','बाजीराव-मस्तानी' असे एकाहून एक सरस चित्रपट बॉलिवूडला देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali) . आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी असंख्य सुपरहिट चित्रपट देऊन नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या यादीत स्वत:चं नाव प्रथम क्रमांकावर कोरलं आहे. ज्या प्रमाणे संजय लीला भन्साळी त्यांच्या प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत येतात. त्याचप्रमाणे अनेकदा त्यांच्या पर्सनल लाइफचीही चर्चा होते. यात खासकरुन त्यांच्या नावाची. भन्साळी त्यांच्या नावापुढे कायम आपल्या आईचं नाव लावतात. त्यामुळे आईचं नाव लावण्यामागील कारण किंवा त्यांच्या वडिलांचं खरं नाव काय असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडतात. त्यामुळेच आजपर्यंत संजय लीला भन्साळी यांनी वडिलांचं नाव का लावलं नाही हे जाणून घेऊयात.
अलिकडेच संजय लीला भन्साळी यांचा 'गंगुबाई काठियावाडी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे सध्या ते सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यात त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफचीदेखील चर्चा होत आहे. त्यामुळेच त्यांच्या वडिलांचं नाव काय? किंवा ते कायम आईचं नाव का लावतात ते पाहुयात.
वडिलांचं नाव न लावण्यामागे हे आहे खरं कारण
संजय लीला भन्साळी यांचे वडील प्रसिद्ध निर्माता होते. मात्र, करिअरमध्ये अनेक चढउतार सहन केल्यामुळे ते दारुच्या आहारी गेले होते. दारुच्या नशेत असल्यामुळे त्यांचं घराकडे दुर्लक्ष होऊ लागलं होतं. त्यामुळे वडिलांची ही अवस्था पाहता संजय भन्साळी यांच्या आईने लीला भन्साळी यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्या गुजराती नाटकांमध्ये वगैरे काम करुन घरखर्च चालवत होत्या. इतकंच नाही तर त्यांनी अनेकदा लोकांचे कपडेदेखील शिवून दिले. त्यामुळेच आपल्या आईने आयुष्यभर केलेला संघर्ष, कष्ट याची जाणीव ठेऊन संजय भन्साळी यांनी त्यांच्या नावापुढे आईचं नाव लावण्यास सुरुवात केली.
काय आहे त्यांच्या वडिलांचं नाव
संजय लीला भन्साळी यांच्या वडिलांचं नाव डी. ओ. भन्साळी असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, ते कायम आईचं नाव लावत असल्यामुळे त्यांच्या वडिलांचं नाव फार मोजक्या जणांना माहित आहे. संजय लीला भन्साळी उत्तम दिग्दर्शक असण्यासोबत लेखक, निर्मातादेखील आहेत.