हिंदी कलाविश्वातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक लीलाधर सावंत (Leeladhar Sawant ) यांचं निधन झालं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून दीर्घ आजाराने लीलाधर सावंत त्रस्त होते. अखेर वाशिम येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १७७ हिंदी चित्रपटांचं कला दिग्दर्शन करणारे लीलाधर सावंत हे काही वर्षांपूर्वीच चंदेरी दुनियेला रामराम करत वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथे स्थायिक झाले होते.लीलाधर सावंत यांच्या दोन बायपास शस्त्रक्रिया झाल्या होत्या. इतकंच नाही तर त्यांना दोनदा ब्रेन हेमरेज अटॅकही आले होते. सोबतच त्यांची जीभ देखील निकामी झाली होती. या आजारपणामध्ये त्यांची सगळी जमापुंजी खर्च झाली होती. त्यामुळेच एका मुलाखतीत त्यांची पत्नी पुष्पा सावंत यांनी लीलाधर सावंत यांच्या सहकाऱ्यांना आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं.
लीलाधर सावंत यांनी तब्बल २५ वर्ष कलाविश्वात कला दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. मात्र, १० वर्षांपूर्वीच त्यांनी हे क्षेत्र सोडून वाशिममधील जऊळका येथे वास्तव्यास आले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये लीलाधर सावंत यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. लॉकडाउनमध्ये त्यांनी आर्थिक अडचणींनादेखील सामोरं जावं लागलं.
लीलाधर सावंत यांच्या नावावर आहेत अनेक पुरस्कार
कला दिग्दर्शक लीलाधर सावंत यांनी ‘सागर’, ‘हत्या’, ‘100 डेज’, ‘दिवाना’, ‘हद कर दी आपने’ अशा जवळपास 177 चित्रपटांना कला दिग्दर्शन केले होते. त्यांना फिल्मफेअर पुरस्कार, माणिकचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.