नवनिवार्चित खासदारकंगना राणौत (Kangana Ranaut) काल चंदीगढ विमानतळावरुन दिल्लीसाठी निघाली होती. तेव्हाच एका महिला सुरक्षाकर्मीने तिच्या कानाखाली वाजवली. या घटनेनंतर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने केलेल्या वक्तव्याविरोधात महिला सुरक्षाकर्मीच्या मनात राग होता. म्हणूनच तिने कानाखाली मारली. आता तिला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेनंतर काहींनी कंगनाला पाठिंबा दिला तर काहींनी त्या ही घटना फार मोठी नसल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान एका बॉलिवूड निर्मात्याने कंगनासोबत घडलेल्या या घटनेची तुलना थेट इंदिरा गांधींच्या हत्येशी केली आहे.
फिल्ममेकर अशोक पंडित (Ashok Pandit) यांनी कंगना रणौतसोबत घडलेल्या घटनेवर भाष्य केले आहे. आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन व्हिडिओ शेअर करत ते म्हणाले, "कंगनासोबत जी वर्तवणीक झाली ती चुकीची आहे. मी याची निंदा करतो. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींसोबतही अशाच प्रकारची घटना झाली होती. आज कंगनासोबत होत आहे. मला वाटतं त्या सीआयएसएफ महिला सुरक्षाकर्मीला लवकर अटक करावी आणि तिच्याविरोधात कडक कारवाई करावी. जेणेकरुन भविष्यात आणखी कोणीही खासदारासोबत असा दुर्व्यवहार करणार नाही."
या घटनेनंतर कंगनाने व्हिडिओ शेअर करत आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. मात्र पंजाबमध्ये वाढणारा उग्रवाद, दहशतवाद आपण कसा हँडल करणार आहोत यावरही चिंता व्यक्त केली. कंगना राणौतने लोकसभा २०२४ मध्ये विजय मिळवला.हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून तिने भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली. काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केला. लवकरच ती खासदारकीची शपथ घेणार आहे.