सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरसशी लढतोय. चौथ्या लॉकडाऊनमध्येही कोरोनाचे रूग्ण कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढत आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीही कोरोना व्हायरसमुळे हादरली आहे. बॉलिवूडचे दिग्गज नेते किरण कुमार यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली. पाठोपाठ सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक कुणाल कोहली यांच्या कुटुंबावरही कोरोनामुळे दु:खाचा डोंगर कोसळला. होय, कुणाल कोहलीच्या मावशीचा कोरोनाने मृत्यू झाला. खुद्द कुणाल कोहली यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मावशीचे अखेरचे दर्शनही त्यांना घेता आले नाही.
‘8 आठवड्यांपासून माझी मावशी कोरोनाशी झुंज देत होती. अखेर तिने जगाचा निरोप घेतला. ती शिकागोमध्ये होती. तिचे अंतिम दर्शनही आम्ही घेऊ शकलो नाही, हे प्रचंड वेदनादायी आहे,’ असे कुणाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
एका दुस-या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, ‘आमचे कुटुंब खूप मोठे आहे. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. पण यावेळी आम्ही एकमेकांसोबत नाही, हे दु:खद आहे. आता मी माझी आई, मावशी आणि मामांना एकत्र कधीच पाहू शकणार नाही. मावशीची मुलगी रोज रूग्णालयात जायची आणि कार पार्किंगमध्ये आपल्या कारमध्ये बसून आई बरे व्हायची प्रार्थना करत राहायची. कारण तिला रूग्णालयात प्रवेश नव्हता. हा कोव्हिड प्रचंड निष्ठूर आहे. इतका निष्ठूर होऊ नकोस...’
वरूण धवनच्या मावशीचेही निधन
नुकतेच वरूण धवनच्या मावशीचेही निधन झाले. शनिवारी वरूण धवनने मावशीला सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली होती. वरूणची मावशी सुद्धा अमेरिकेच्या शिकागोमध्ये राहायची. वरूणने मावशीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही. पण रिपोर्टनुसार, त्याच्या मावशीचे निधनही कोरोनामुळे झाले.