प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राजकुमार संतोषी(rajkumar santoshi) यांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 2015 मध्ये घडलेल्या एका प्रकरणासाठी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांना दोन कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. जामनगर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
राजकुमार संतोषी यांना 2015 मधील एका चेक बाऊन्स प्रकरणी 2 वर्षाचा तुरुंगवास आणि 2 कोटींचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. 2015 मध्ये राजकुमार संतोषी यांनी जामनगरचे व्यावसायिक अशोकलाल यांच्याकडून एक कोटी रुपये घेतले होते. मात्र, त्यांचे पैसे परत केली नाही. त्यामुळेच अशोकलाल यांनी राजकुमार संतोषी यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.
2019 मध्ये अशोकलाल यांनी राजकुमार संतोषी यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. यावेळी "राजकुमार संतोषी आणि अशोकलाल हे चांगले मित्र असून 2015 मध्ये संतोषी यांनी अशोकलाल यांच्याकडून एक कोटी रुपये घेतले होते. यावेळी संतोषी यांनी अशोकलाल यांना 10 लाखांचे 10 चेक दिले होते. मात्र, 2016 मध्ये हे सर्व चेक बाऊन्स झाले. या काळात अशोकलाल यांनी सातत्याने राजकुमार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सकारात्मक उत्तर मिळाले नाही", असा युक्तीवाद अशोकलाल यांच्या वकिलांनी न्यायालयात केला होता.
याप्रकरणी तब्बल 17 वेळा सुनावणी करण्यात आली होती. परंतु, या सगळ्या सुनावणींना राजकुमार संतोषी गैरहजर होते. 18 व्या सुनावणीला राजकुमार संतोषी थेट न्यायलयात हजर झाले. यावेळी न्यायलयाने त्यांना बाऊन्स झालेल्या प्रत्येक चेकसाठी त्यांना 15 हजार रुपये द्यावे लागतील, असे आदेश दिले. तसंच दोन वर्षाचा कारावासाची शिक्षाही सुनावली आहे.
दरम्यान, राजकुमार संतोषी यांचा लाहौर 1947 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सनी देओल आणि आमिर खान हे कलाकार झळकणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच त्यांना शिक्षा सुनावल्यामुळे कलाविश्वात सध्या चर्चेला उधाण आलं आहे.