Join us

अखेर प्रियंका चोपडाने नीरव मोदीसोबतचे सर्व करार केले रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 12:40 PM

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडाने पीएनबी महाघोटाळ्यातील फरार असलेल्या नीरव मोदीसोबतचे सर्व करार रद्द केले आहेत. त्यामुळे प्रियंका आता ...

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडाने पीएनबी महाघोटाळ्यातील फरार असलेल्या नीरव मोदीसोबतचे सर्व करार रद्द केले आहेत. त्यामुळे प्रियंका आता नीरव मोदीच्या प्रॉड््क्टची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर नाही. याबाबतची अधिकृत माहिती प्रियंका चोपडाच्या प्रवक्त्याकडून देण्यात आली आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पीएनबी महाघोटाळ्यानंतर प्रियंकाने हा तडकाफडकी निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियंका नीरव मोदीवर कायदेशीर खटला दाखल करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु नंतर या बातम्यांचे खंडण करताना प्रियंका असे करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्याचबरोबर नीरव मोदीबरोबरचे सर्व करार प्रियंका तोडणार असल्याचेही सांगण्यात आले होते. त्यानुसार प्रियंकाने आता सर्व करार रद्द केले आहेत. प्रियंकाची गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात नीरव मोदीने त्याच्या ज्वेलरी ब्रॅण्डसाठी ग्लोबल ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली होती. ३५ वर्षीय प्रियंका सध्या न्यू यॉर्कमध्ये तिच्या क्वांटिको या टीव्ही सिरीजच्या तिसºया सीजनची शूटिंग करीत आहे. जेव्हा नीरव मोदीचा हा महाघोटाळा उघडकीस आला तेव्हाच प्रियंकाने त्याच्यासोबतचे सर्व करार रद्द करण्याचे संकेत दिले होते. तसेच कायदेशीर सल्ला घेण्याचे काम सुरू असल्याचे प्रियंकाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले होते. त्यानुसार प्रियंकाने आता सर्व करार रद्द केले आहेत.  दरम्यान, नीरव मोदीने पंजाब नॅशनल बॅँकेत ११,३०० कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. बॅँकिंग क्षेत्रात हा सर्वांत मोठा दुसरा घोटाळा समजला जात आहे. सध्या नीरव मोदी फरार असून, इतरही काही सेलिब्रिटी त्याच्यासोबतचे करार रद्द करण्याच्या तयारीत आहेत. बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडचेही काही सेलिब्रिटी त्याच्याशी जोडले गेले आहेत.