Join us

'कल्की 2898' चं रहस्यात्मक पोस्ट रिलीज; शरीराभोवती पट्टी गुंडाळलेल्या अभिनेत्याला ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 13:06 IST

Kalki 2898 : ‘कल्की 2898 एडी’ हा एक सायन्स फिक्शन चित्रपट असून या सिनेमाची घोषणा झाल्यापासून तो सातत्याने चर्चेत येत आहे.

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री दिपिका पदुकोण आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास यांच्या 'कल्की 2898' या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. या सिनेमाविषयी एकएक अपडेट समोर येत असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील प्रभासचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता. त्यानंतर आता या सिनेमाचं आणखी एक उत्कंठा वाढवणारं पोस्टर रिलीज झालं आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये दिसणारी व्यक्ती कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला असून अनेक जण या अभिनेत्याचं नाव जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘कल्की 2898 एडी’ हा एक सायन्स फिक्शन चित्रपट असून या सिनेमाची घोषणा झाल्यापासून तो सातत्याने चर्चेत येत आहे. अलिकडेच या सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरमध्ये एक व्यक्ती एका जुन्या मंदिरात बसली असून तिच्या संपूर्ण शरीराभोवती पांढरी पट्टी गुंडाळली आहे. तसंच एका कवडशामधून येणाऱ्या मंद प्रकाशाकडे तो पाहत आहे. या फोटोमध्ये या व्यक्तीचे केवळ डोळे दिसत असून या डोळ्यांवरुन तो व्यक्ती कोण असावा याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे.

फोटोत दिसणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता अमिताभ बच्चन असल्याचं स्पष्ट होत आहे. नेटकऱ्यांनी फक्त डोळ्यांवरुन बिग बींना ओळखलं आहे. हा फोटो निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच ‘तो कोण आहे हे जाणून घ्यायची वेळ आता आली आहे!’ असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, या सिनेमात अमिताभ बच्चन नेमकी कोणती भूमिका साकारणार याचं उत्तर २१ एप्रिल रोजी ७.१५ मिनिटांनी स्टार स्पोर्ट्स इंडियावर मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रभास आणि दिपीका एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. हा सिनेमा येत्या ९ मे रोजी रिलीज होणार आहे.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाअमिताभ बच्चनप्रभासदीपिका पादुकोण