'रेस ३' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून बॉलिवूडचा दबंग खान सलमानची भूमिकाही रसिकांना चांगली भावली. या यशानंतर सलमान खान आता ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र झाला आहे. गेल्याच आठवड्यात ‘भारत’च्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. या चित्रपटातला सलमानचा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सलमानचा स्टाईलिस्ट अॅश्ले रिबेलो याने हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ चित्रपटात दिशा पटानी आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दहा वर्षांनंतर सलमान खान आणि प्रियांका एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. तर दिशा पटानी पहिल्यांदाच सलमान व प्रियांकासोबत काम करताना दिसणार आहे. ‘भारत’ मधला सलमानचा पहिला लूक अॅश्लेने प्रसिद्ध केला आहे. येत्या काही काळात आणखी काही लूकही पाहायला मिळतील असेही त्याने सांगितले आहे.
‘भारत’ चित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात प्रियांका व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न. गत रविवारी मुंबईच्या फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये ‘भारत’चे शूटींग सुरु झाले. या शेड्यूलच्या काही भागात सर्कसचे काही सीन्स शूट केले जात आहेत. चित्रपटाच्या कथेनुसार, सलमानला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी सर्कशीत काम करावे लागते. यात तो ‘मौत का कुआँ’मध्ये मोटरसायकलवर चित्तथरारक कसरती करताना दिसेल. त्याच्यासोबत या काळात दिशा पटानीही दिसणार असल्याचे समजते आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे.