Join us

‘आग’ हा पहिलाच चित्रपट असलेला आर. के स्टुडिओ आगीतच भस्म!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 3:32 PM

आर. के. स्टुडिओ म्हणजे बॉलिवूडच्या अनेक अमूल्य आठवणींचा साक्षीदार आहे. आगीत आर. के. स्टुडिओचा काही भाग जळून खाक झाला असला तरी या ऐतिहासिक आठवणी अमर आहेत, हेच खरे आहे.

बॉलिवूडला जगात स्थान मिळवून देणाºया आर. के स्टुडिओला लागलेल्या आगीची दृश्ये समोर आली अन् संबंध बॉलिवूडकरांच्या काळजात धस्स झाले. कारण अनेक चित्रपटांना जन्म देणाºया आर. के. स्टुडिओशी अनेक बड्या स्टार्सच्या आठवणी जुळल्या आहेत. या स्टुडिओच्या व्यासपीठावर अनेकांनी आपल्या अभिनयाला बळकटी दिली आहे. त्यामुळेच आजही आर. के. स्टुडिओमध्ये शूटिंग करणे सन्मानाचे समजले जाते. मात्र आज जेव्हा आर. के. स्टुडिओ भीषण आगीत खाक होत असल्याचे वृत्त समोर आले तेव्हा स्टुडिओमध्ये काम करणाºयांच्या डोळ्यासमोर स्टुडिओचा देदीप्यमान इतिहास तरळला नसेल तरच नवल. भारत स्वातंत्र्य झाल्याच्या दुुसºयाच वर्षी ऐटीत उभा राहिलेला आर. के. स्टुडिओ आजही रुबाबात बॉलिवूडकरांना साथ देत होता. बॉलिवूडचे शोमॅन राज कपूर यांनी त्यांच्याच नावाच्या पहिल्या दोन अक्षराने म्हणजेच ‘आरके’ नावाने १९४८ साली मुुंबईतील चेंबूर परिसरात या स्टुडिओची स्थापना केली. बॉलिवूडमध्ये आजही वर्चस्व असलेल्या कपूर घराण्याशी संबंधित असल्यामुळे या स्टुडिओला अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाली. ज्या आगीच्या कारणामुळे आज आपण या स्टुडिओशी बोलत आहोत, त्याच ‘आग’ या नावाचा पहिला चित्रपट या स्टुडिओमध्ये चित्रित केला गेला. हा निव्वळ योगायोग असला तरी, ‘आग’ ही बाब नक्कीच बॉलिवूडकरांच्या स्मरणात राहील. या स्टुडिओमध्ये चित्रित केलेले अनेक चित्रपट गाजले. रोमान्सचे खास कनेक्शन असलेल्या या स्टुडिओमध्ये राज कपूर यांचे अनेक चित्रपट चित्रित झाले अन् ते गाजले.  १९४८ साली ‘आग’ची निर्मिती केल्यानंतर १९४९ मध्ये बरसात, १९५१ मध्ये आवारा, १९५३ मध्ये आलेला ‘आह’ या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर एक वेगळा विक्रम निर्माण करताना आर. के. स्टुडिओचे महत्त्वही अधोरेखित केले. हे चित्रपट सुपरडुपर हिट झाले, त्याचबरोबर आर. के. प्रॉडक्शनचा ब्रॅण्डही बॉलिवूडमध्ये गाजू लागला. राज कपूूर यांच्या प्रसिद्धीचे वलय असल्यामुळे आर. के. स्टुडिओची यशस्वी घोडदौड सुरूच होती. पुढे १९५४ मध्ये आलेल्या ‘बूट पॉलिश, १९५५ मधला ‘श्री ४२०’ त्यानंतर ‘जागते रहो’, ‘जिस देश मे गंगा बहती है’ अशा गाजलेल्या चित्रपटांची आर. के. स्टुडिओमध्ये निर्मिती केली गेल्याने स्टुडिओचा डंका सातासमुद्रापार वाजू लागला. ६० आणि ७० च्या दशकातले ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’, ‘कल आज और कल’ आणि ‘बॉबी’सारख्या चित्रपटातील अनेक महत्त्वाचे सीन आणि गाणी आर. के. स्टुडिओमध्ये शूट केल्याने, विदेशी इंडस्ट्रीही आर. के. स्टुडिओचे गुणगाण गाऊ लागली. ‘सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग, राम तेरी गंगा मैली, हिना, प्रेम ग्रंथ या सुपरडुपर हिट चित्रपटांच्या निर्मितीमुळे बॉलिवूड वर्तुळात आर. के. फिल्म आणि पर्यायानं आर. के. स्टुडिओचा दबदबा कायम राहिला. आर. के. स्टुडिओची खासियत म्हणजे इथे शूट होणाºया चित्रपटाचे कॉस्च्युम स्टुडिओमध्ये संग्रहित ठेवले जातात. राज कपूर यांच्या निधनानंतर आर. के. स्टुडिओची सूत्रे रणधीर कपूर यांच्या हातात आली. सध्या ऋषी कपूर आर. के. स्टुडिओचा कारभार सांभाळत आहेत.मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे चित्रपटांशिवाय, लहान-मोठ्या टीव्ही सिरियल्स आणि रिअ‍ॅलिटी शोच्या चित्रीकरणासाठी आर. के स्टुडिओलाच पसंती दिली जाते. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या शाहरूख खानच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटातले काही सीन आर. के. स्टुडिओमध्येच शूट झाले होते. आर. के. स्टुडिओ म्हणजे बॉलिवूडच्या अनेक अमूल्य आठवणींचा साक्षीदार आहे. आगीत आर. के. स्टुडिओचा काही भाग जळून खाक झाला असला तरी या ऐतिहासिक आठवणी अमर आहेत, हेच खरे आहे.