सध्या रणदीप हूडा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची खुप चर्चा आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमातील रणदीप हूडाच्या अभिनयाचं खुप कौतुक होत आहे. रणदीपने या सिनेमासाठी त्याचं राहतं घर गहाण ठेवलं अशीही चर्चा आहे. पण तुम्हाला माहितच असेल की सावरकरांवर बनलेली ही पहिली कलाकृती नाही. याआधीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर 'वीर सावरकर' नावाचा सिनेमा आला आहे. सावरकरांचं थक्क करणारं आयुष्य पाहता त्यांच्यावरील सिनेमाची निर्मिती करणं हे शिवधनुष्यच म्हणावं लागेल. असंच शिवधनुष्य संगीतकार सुधीर फडकेंनी २० वर्षांपुर्वी पेललं होतं. परंतु त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. कसा होता २००१ साली आलेल्या 'वीर सावरकर' सिनेमाचा पडद्यामागील कष्टप्रद प्रवास. जाणून घ्या...
अंतिम लक्ष्य साधण्याचा ध्यास कोणी घेतला तर तो माणूस ते कार्य काहीही करुन पूर्ण करतो. अशीच गोष्ट घडली दिग्गज संगीतकार सुधीर फडके यांच्या बाबतीत. सुधीर यांना मराठी मनोरंजन विश्वात आजही प्रेमाने आणि आदराने बाबूजी म्हटलं जातं. बाबूजींनी सावरकरांवर सिनेमा बनवायचा ध्यास घेतला. १९९० साली सिनेमाच्या मुहूर्त शॉटचंही चित्रीकरण करण्यात आलं. परंतु अनेक अडथळे आले अन् १९९८ पर्यंत सिनेमाचं शुटींग सुरु होतं. सिनेमाची निर्मिती करणाऱ्या बाबूजींकडे असलेली रक्कम संपली होती.
अशावेळी महान गायिका लता मंगेशकर यांनी बाबूजींना मदत करण्यासाठी त्यांच्या सोन्याच्या बांगड्या विकून आलेले पैसे सिनेमाच्या निर्मितीसाठी दिले. याशिवाय जागतिक सिनेमांच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकांकडून मदत मागण्यात आली. तब्बल १० हजार लोकांनी दिलेल्या देणगीच्या रकमेतून पैशांचं मोठं पाठबळ उभं राहिलं. याशिवाय गायिका आशा भोसले, पंडित भीमसेन जोशी अशा प्रतिभासंपन्न गायकांनीही लोकांना मदतीचं आवाहन केलं. अशाप्रकारे 'वीर सावरकर' प्रदर्शित होण्यासाठी निर्माण झालेलं आर्थिक संकट दूर झालं. लोकांकडून देणगी घेऊन निर्मिती झालेला 'वीर सावरकर' हा जगातला पहिला सिनेमा मानला जातो.
सर्व अडचणींवर मात करुन २००१ साली 'वीर सावरकर' सिनेमा भारतभरात प्रदर्शित झाला. शाळा, कॉलेज आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना हा सिनेमा दाखवण्यात आला. गेली अनेक वर्ष 'वीर सावरकर' हा सिनेमा सावरकरांवरील महत्वाचा सिनेमा म्हणून ओळखला जातो. शैलेंद्र गौड यांनी सावरकरांची भूमिका सिनेमात साकारलेली. २०१२ साली नरेंद्र मोदींनी या सिनेमाचा गुजराती अनुवाद रिलीज केला. असा होता सावरकरांवरील पहिल्या सिनेमाचा अडचणींचा प्रवास.