सत्तरच्या दशकातील ब्लॉकबस्टर सिनेमा शोलेतील सांभाच्या भूमिकेतून अभिनेते मॅक मोहन (Mac Mohan) यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटविली होती. या भूमिकेनंतर ते सांभाच्या नावाने ओळखू लागले होते. मॅक यांनी चित्रपटात कधीच मुख्य भूमिका केली नाही पण ते बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटात झळकले. त्यांनी बॉलिवूडमधील प्रत्येक मोठ्या स्टारसोबत स्क्रीन शेअर केली. जवळपास तीन तासाच्या शोलेमध्ये सांभा फक्त एकच डायलॉग बोलला होता आणि हा डायलॉग होता पूरे पचास हजार. या एका डायलॉगने ते जगभरात लोकप्रिय झाले होते.
पूरे पचास हजार या डायलॉगचा किस्सा समजल्यावर हैराण व्हाल कारण या एका डायलॉगच्या शूटिंगसाठी मॅक मोहन यांना मुंबई ते बंगळुरू असा २७ वेळा प्रवास करावा लागला होता. सुरूवातीला शोलेमध्ये त्यांची भूमिका मोठी होती. मात्र चित्रपटाचे एडिटिंग झाल्यानंतर त्यांचा फक्त एकच डायलॉग होता. मॅक मोहन शोलेचे एडिटिंग झाल्यानंतर चित्रपट पाहून खूप हताश झाले होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, जेव्हा मी सिनेमा पाहिला तेव्हा मी रडू लागलो होतो. मी थेट दिग्दर्शक रमेश सिप्पींकडे गेलो आणि त्यांना म्हणालो की माझा एवढा छोटा रोल का ठेवला? तुम्हाला हवे होते तर काढून टाकायचे. तेव्हा ते म्हणाले की, जर चित्रपट हिट झाला तर जग तुला सांभाच्या नावाने ओळखेल आणि तसेच घडले.