नरगिस ते करिना कपूर आणि दिलीप कुमार ते शाहरूख खान अशा अनेक दिग्गजांचे चेहरे खुलवण्याचे काम करणारे सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट पंढरीदादा जुकर यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. तब्बल सहा दशके चित्रपटसृष्टीला वाहून घेतलेल्या पंढरीदादांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार झालेत. पण बॉलिवूडचा कुठलाही मोठा चेहरा दादांच्या अंत्यसंस्कारावेळी दिसला नाही. दादांचे जवळचे नातेवाईक, मेकअप इंडस्ट्रीशी संबंधित लोक इतकेच काय ते चेहरे यावेळी दिसले.
पंढरीदादा जुकर यांच्या जवळच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दादांच्या मृत्यूची बातमी समजतात अभिनेत्री साक्षी तंवर, गौरी प्रधान, हितेन मोटवानी, वंदना गुप्ते, विद्या पटवर्धन आणि बालाजी टेलिफिल्म्सचे काही कलाकार त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेत. पण बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी मात्र पंढरीदादांच्या अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवली.
पंढरीदादा जुकर यांचे खरे नाव हरिचंद्र जुकर होते. मात्र चित्रपटसृष्टीत पंढरीदादा याच नावाने त्यांना ओळखत. ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटांपासून करिअरची सुरूवात करणाºया पंढरीदादांनी झनक झनक पायल बाजे,चित्रलेखा, ताजमहल, नीलकमल, शोले अशा 500 हून अधिक चित्रपटांसाठी रंगभूषाकार म्हणून काम केले. मीना कुमारी, मधुबाला, नूतन, दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, राज कुमार, शाहरूख खान, आमिर खान, माधुरी दीक्षित, करिना कपूर अशा बॉलिवूडच्या कितीतरी चेह-यांची रंगभूषा करून पंढरीदादांनी त्यांचे सौंदर्य रूपेरी पडद्यावर खुलवले होते.
त्यांचा एक किस्सा तर आजही आवर्जुन सांगितला जातो. होय, सात हिंदुस्तानीच्या सेटवरचा हा किस्सा. गोव्यात या चित्रपटाचे शूटींग सुरु होते. सिनेमातील भूमिकेनुसार, अमिताभ यांना दाढी लावायची होती. एक दिवस अमिताभ यांचा मेकअप झाल्यानंतर पंढरीदादांना अचानक मुंबईला परतावे लागणार होते. अशास्थितीत अमिताभ यांनी काय करावे तर पंढरीदादा गोव्यात येईपर्यंत त्याच मेकअपमध्ये वावरले. चेह-यावरचा मेकअप जाऊ नये, यासाठी त्यांनी तीन दिवस तोंडही धुतले नाही.