संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी लढतेय़ पण अशाही स्थितीत भारत-पाकिस्तानचे संबंध तणावाचे आहेत. पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यावरची बंदी याही काळात लागू आहे. पण याऊपरही काही भारतीय गायकांनी पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्यासोबत एका ऑनलाईन कार्यक्रमात भाग घेतला. ही बाब निदर्शनास येताच फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉइजने (एफडब्ल्यूआयसीई) या सर्वांना नोटीस जारी केले आहे.
असोसिएशनने पाकिस्तानी गायकांसोबत काम करणा-या सर्व भारतीय कलाकारांना पुन्हा एकदा तंबी दिली आहे. 2016 मधील उरी हल्ल्यानंतर भारतात काम करण्यास पाकिस्तानी कलाकारांना मनाई करण्यात आली. ही मनाई अद्यापही लागू असताना काही भारतीय कलाकारांनी त्याला न जुमानता पाकिस्तानी गायकांसोबत ऑनलाईन कॉन्सर्ट करण्याचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर ही नोटीस जारी करत भारतीय कलाकारांना तंबी देण्यात आली आहे.
तर कडक कारवाई ‘पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यावर बंदी आहे आणि सर्वांना हे ठाऊक आहे. असे असताना अनेक भारतीय कलाकारांनी या बंदीचे उल्लंघन केले. अनेक भारतीय कलाकारांनी पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्यासोबत ऑनलाईन कॉन्सर्ट केले, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोना संकटाशी लढत असताना पाकिस्तान अजूनही भारतीय जवानांना मारण्यात व्यग्र आहे. भारत-पाक यांच्यातील तणाव बघता असहकार्य निर्देश अद्यापही लागू आहेत. यापुढे कुठलाही भारतीय कलाकार पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करताना आढळल्यास त्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. सर्वांनी हे ध्यानात घ्यावे,’ अशी ताकिद फेडरेशनने आपल्या नोटीसमध्ये दिली आहे.