Join us

"तारासिंगचं कुटुंब आवडलं नसेल..." सनी देओलने मागितली माफी; म्हणाला, 'भांडू नका...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 16:32 IST

गेल्या काही दिवसांपासून मी सगळीकडे फिरत आहे. तुमच्याशी बोलत आहे....

सनी देओलचा Sunny Deol) बहुप्रतिक्षित 'गदर 2' (Gadar 2) आजच रिलीज झाला. 2001 साली आलेल्या 'गदर' चा हा सिक्वल आहे. प्रेक्षकांच्या सिनेमावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांना चित्रपट आवडलाय तर काही जण मात्र नाराज झालेत. गेल्या अनेक दिवसांपासून सनी देओल आणि अमिषा पटेल प्रमोशन करत होते. आज सिनेमा रिलीज होताच सनी देओलने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांची माफी मागितली आहे. काय आहे यामागचं कारण वाचा

सनी देओलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने चाहत्यांशी संवाद साधला आहे. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहा अशी विनंती त्याने केली आहे आणि सिनेमा आवडला नसेल तर भांडू नका माफ करा असंही तो म्हणाला आहे. 

सनी देओल म्हणतो, 'सगळ्यांना नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून मी सगळीकडे फिरत आहे. तुमच्याशी बोलत आहे. मला माहितीए तारा सिंह आणि सकीनाच्या कुटुंबावर तुमचं खूप प्रेम आहे. तुम्ही याचीच वाट पाहत होतात. आज तुम्ही या कुटुंबाला बघण्यासाठी जात आहात. एवढंच सांगेन हे कुटुंब अगदी तसंच आहे जसं तुम्ही शेवटचं बघितलं होतं. आधीसारखंच गोड कुटुंब आहे. तुम्ही जेव्हा त्यांना भेटायला जाल तेव्हा खूप खूश व्हाल. आणि चुकून कोणाला हे कुटुंब आवडलं नसेल तर भांडू नका. माफ करा यार. कारण मनात फक्त प्रेम असलं पाहिजे आणि ते फक्त कुटुंबालाच माहित आहे. लव्ह यू ऑल. ऑल द बेस्ट.'

सनी देओलचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. अनेक लोक सनी पाजीला प्रेम देत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले, 'गदर एक फिल्म नाही तर इमोशन आहे.' गदर पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सिनेमातील दोन सीन्सची प्रेक्षक खूपच तारीफ करत आहेत. एक हँडपंप आणि वीजेचा खांबवाला सीन आणि दुसरा जेव्हा सकीना बऱ्याच वर्षांनी तारासिंगला भेटते. 'गदर 2' अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, गौरव चोप्रा, लव्ह सिन्हा आणि सिमरत कौर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

टॅग्स :सनी देओलअमिषा पटेलसोशल मीडियासिनेमा