Join us

Gandhi Godse Ek Yudh: ‘गांधी-गोडसे एक युद्ध’च्या दिग्दर्शकांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षा वाढवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 11:09 AM

Gandhi Godse Ek Yudh: ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाला विरोध सुरू असताना दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि निर्मात्यांना धमकी आली आहे.

Gandhi Godse Ek Yudh: गेल्या काही महिन्यांपासून अनेक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडले, अनेक चित्रपटांना नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले, तर काही चित्रपटांसाठी बॉयकॉट ट्रेंडही चालवण्यात आले. पठाण चित्रपटावरून आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर आता गांधी-गोडसे एक युद्ध चित्रपटावरून दावे-प्रतिदावे होताना दिसत आहे. यातच या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. यानंतर राजकुमार संतोषी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

राजकुमार संतोषी यांना फोनद्वारे धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजकुमार संतोषी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कुटुंबालाही धोका आहे. तसेच याप्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यासह चित्रपटाचे निर्माते ललित कुमार श्याम टेकचंदानी यांनाही धमकी आली आहे. 

राजकुमार संतोषी यांची मुंबई पोलिसांत तक्रार

राजकुमार संतोषी यांनी मुंबई पोलिसांना एक पत्र दिले आहे. २० जानेवारी रोजी आमच्या टीमने गांधी-गोडसे एक युद्ध हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एक विशेष पत्रकार परिषद घेतली होती. त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला. माझी टीम (दिग्दर्शक, निर्माता आणि कलाकार) अंधेरी भागात पत्रकार परिषद करत होती, तेव्हा काही लोक तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर मला काही अज्ञात लोकांकडून अनेक धमक्या आल्या आणि या चित्रपटाचे प्रदर्शन आणि प्रमोशन थांबवण्यास सांगण्यात आले. या घटनेनंतर मला असुरक्षित वाटत आहे. अशा लोकांना मोकळे सोडले आणि तुम्ही स्वत: कोणतेही पाऊल उचलत नसाल तर त्यामुळे केवळ आमचेच नाही तर अन्य लोकांचेही मोठे नुकसान होऊ शकते, असे राजकुमार संतोषी यांनी पत्रात म्हटले आहे. 

मला आणि माझ्या परिवाराला सुरक्षा प्रदान करावी

या प्रकरणी कायद्यानुसार आवश्यक ती सर्व पावले उचलावीत अशी माझी विनंती आहे. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांसाठी अतिरिक्त सुरक्षा प्रदान करण्याची विनंती करतो, असे पत्र राजकुमार संतोषी यांनी मुंबई पोलिसांना दिले आहे. तत्पूर्वी, या चित्रपटाविरोधात लोकांनी मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. चित्रपट निर्माते चित्रपटाचे प्रमोशन करत असताना काही लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात निर्मात्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

दरम्यान, ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाद्वारे राजकुमार संतोषी हे महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गौरव करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आंदोलकांनी केल्याचे सांगितले जात आहे. त्याठिकाणी विरोध इतका वाढला होता की निर्मात्यांना पोलिसांना बोलवावे लागले. निर्मात्यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही आणि शेवटी त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट गोडसेचा गौरव करत नाही, असे दिग्दर्शक, निर्माते राजकुमार संतोषी यांनी स्पष्ट केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :बॉलिवूड