बॉलिवूड म्हणजे ग्लॅमरस जगत. इथे कधी काय होईल काहीच सांगता येत नाही.. या झगमगाटात एंट्री घेतलेले स्टार्स क्षणार्धात लाखों-करोडोंच्या घरात पैसा कमावतात. आता हेच बघा ना, आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री रिचा चड्ढा हिने नुकत्याच लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये रॉयल्टीचा मुद्दा मांडला आहे. त्याचसोबत ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या चित्रपटासाठी तिला किती मानधन मिळालं होतं, हे सुद्धा तिने सांगितलं.
‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या दोन्ही चित्रपटांसाठी रिचाला केवळ अडीच लाख रुपये मानधन मिळालं होतं. याविषयी तिने पुढे लिहिलं, ‘आणि हे ठीकच होतं. दिग्दर्शक अनुराग कश्यपने मला संधी दिली होती आणि त्याची मी आभारी आहे. त्या चित्रपटासाठी मला मानधन मिळेल असंही मला वाटलं नव्हतं. पण बॉक्स ऑफिसवर तो हिट झाला आणि त्यामुळे माझ्या करिअरला गती मिळाली.’ हे सांगत असतानाच रिचाने रॉयल्टीचा मुद्दा मांडला. ‘चित्रपटाला विविध माध्यमांवर प्रचंड यश मिळालं. अर्थात या यशाचा रॉयल्टीच्या रुपात काहीतरी फायदा ठराविक लोकांना मिळाला असेल. जरी मला या चित्रपटासाठी रॉयल्टी मिळत असती तरी त्याची रक्कम खूपच कमी असती.’
कलाकारांना रॉयल्टीच्या स्वरुपात योग्य ते मानधन न मिळल्याने आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते निराधार राहत असल्याची खंतही तिने व्यक्त केली. परवीन बाबी, एके. हंगल, भगवान दादा यांसारख्या कलाकारांची तिने उदाहरणं सुद्धा दिली. ‘प्रत्येक विभागातल्या व्यक्तीला रॉयल्टीची रक्कम मिळाली ही माझी इच्छा म्हणजे कधीही पूर्ण न होणारं स्वप्न आहे. आपल्या सभोवतालच्या सर्व संरचना कोलमडून पडत असताना त्याच तुकड्यांमधून आपण नवीन काहीतरी तयार करू शकू. एका व्यक्तीने म्हटलं होतं की, संकटाचं रुपांतर संधीमध्ये करता येतं. पण या वाक्याचा अर्थ अनेकांनी त्यांच्या सोयीनुसार घेतला. आपल्याकडे आता संधी आहे. या मिळालेल्या अल्पविरामचा उपयोग विकासासाठी करूया’, असं तिने लिहिलं.