अनुराग कश्यपचा ‘गँग्स ऑफ वासेपूर’ हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. होय, 21 व्या शतकातील 100 उत्कृष्ट सिनेमांच्या यादीत या चित्रपटाला स्थान मिळाले आहे. या यादीत स्थान मिळवणारा हा एकमेव भारतीय चित्रपट आहे. ‘द गार्डियन’ने नुकतीच 21 व्या शतकातील 100 उत्कृष्ट सिनेमांची एक यादी जाहीर केली. यात ‘गँग्स ऑफ वासेपूर’ ला 59वे स्थान प्राप्त झाले आहे. या यादीत समाविष्ट होण्याचा मान मिळालेली हा एकमेव चित्रपट ठरला आहे. पॉल थॉमस अँडरसन यांचा There Will Be Blood हा सिनेमा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
मसाला आणि रोमॅन्टिक चित्रपटांचा ट्रेंड मोडित काढत अनुराग कश्यपने 2012 मध्ये ‘गँग्स ऑफ वासेपूर’ हा चित्रपट बनवला होता. प्रेक्षकांसह समीक्षकांनीदेखील या चित्रपटाला डोक्यावर घेतले होते. काही दिवसांपूर्वी अनुरागने ‘बरोबर सात वर्षांपूर्वी या दिवशी माझे आयुष्य उद्धवस्त झाले होते,’ अशी पोस्ट टाकली होती. यामागचे कारणही त्याने लिहिले होते. ‘सात वर्षांपूर्वी मी ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सिनेमा बनवला होता. या सिनेमानंतर प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या. या अपेक्षांपासून दूर जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करतोय. ही साडेसातील 2019 च्या अखेरीस संपेल अशी आशा करतो,’ असे अनुरागने म्हटले होते.