शाहरुख खानची पत्नी गौरी खानने तिला आजवर मिळालेल्या यशाचे श्रेय पतीला आणि मुलांना दिले आहे. मुलांच्या बाबतीत घेतलेल्या एका निर्णयामुळेच मी करियरमध्ये यश मिळवू शकले असे तिचे म्हणणे आहे. आपल्या मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये अधिक चांगले शिक्षण मिळेल असे शाहरुख खान आणि गौरी खान यांना वाटत असल्याने त्यांनी त्यांच्या मुलांना वयाच्या १४ व्या वर्षीच बोर्डिंग स्कूलला पाठवून देण्याचा निर्णय घेतला. शाहरुखची पत्नी गौरीनेच ही गोष्ट तिच्या एका मुलाखतीत सांगितली आहे.
शाहरुख खानला बॉलिवूडमधील किंग म्हटले जाते. पण त्याच्याच प्रमाणे आज त्याची पत्नी गौरीने देखील तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इंटिरिअर डिझायनिंग क्षेत्रातील मातब्बर मंडळींमध्ये तिची गणना केली जाते. मुलांनी आणि शाहरुखनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच करियरमध्ये इतके यश मिळवता आले असे गौरीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
दिल्ली टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत गौरी सांगते, माझ्या मुलांनी माझ्या करियरसाठी मला नेहमीच पाठिंबा दिला. आर्यन आणि सुहाना केवळ १४ वर्षांचे असताना त्यांना बोर्डिंगमध्ये पाठवण्यात आले. मी काम करायला त्याकाळातच सुरुवात केली. मुलं बोर्डिंग स्कूलमध्ये असल्याने त्यांना तिथे खूपच चांगले शिक्षण मिळत होते आणि मला देखील माझ्या कामासाठी जास्तीत जास्त वेळ द्यायला मिळत होता. माझ्या कामाची ते नेहमीच प्रशंसा करतात आणि त्यामुळे मला काम करायला अधिक हुरूप येतो. माझ्या दोन्ही मुलांना माझ्या करियरमध्ये रस नाहीये. सध्या आर्यन लॉस एंजेलिसमध्ये तर सुहाना लंडन मध्ये आहे. ते दोघेही फिल्म मेकिंगचे शिक्षण घेत आहेत.
आर्यन आणि सुहाना यांच्या तुलनेत अबराम खूपच लहान आहे. त्याच्यासाठी कसा वेळ काढतेस असे या मुलाखतीत गौरीला विचारले असता तिने सांगितले होते की, अबरामला सांभाळायची जबाबदारी मी आणि शाहरुखने वाटून घेतली आहे. आठवड्यातील तीन दिवस अबरामला शाहरुख सांभाळतो तर चार दिवस मी सांभाळते. त्यामुळे आम्हाला दोघांनाही आपल्या करियरसाठी वेळ देता येतो.