माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची घोषणा तर झाली. पण आता ही घोषणा वादात सापडली आहे. होय, जॉर्ज यांच्या पत्नी लैला फर्नांडिस यांनी यावर आक्षेप घेतला आहे. माझ्या वा माझ्या कुटुंबाच्या संमतीशिवाय कुठलीही व्यक्ती हे बायोपिक बनवू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. अर्थात हे बायोपिक बनवण्याची घोषणा करणाऱ्या निर्मात्याचे मत वेगळे आहे.गत महिन्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जॉर्ज यांचे बायोपिक बनवण्याची घोषणा केली होती. मी युवा असताना जॉर्ज आणि शिवसेना सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे या दोन व्यक्तिंनी मला सर्वाधिक प्रभावित केले होते. सध्या बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकचे शूटींग सुुरू आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्यात प्रमुख भूमिकेत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लैला यांनी राऊत यांना पत्र लिहून या बायोपिकला विरोध दर्शवला आहे. मी व माझा मुलगा या बायोपिकच्या कल्पेनेसंदर्भात साशंक आहोत. जॉर्ज यांच्या आयुष्यातील तथ्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवले जाईल, अशी भीती आम्हाला आहे. सार्वजनिक आयुष्यात जॉर्ज यांना अनेकदा चुकीचे ठरवण्यात आले. विशेषत: सार्वजनिक आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात.आपल्या बायोपिकबद्दल स्वत:चे मत मांडू शकतील, अशी आज जॉर्ज यांची स्थिती नाही. पण किमान त्यांच्या आयुष्यावर बायोपिक काढण्याची घोषणा करण्यापूर्वी आपण आमच्या कुटुंबाशी चर्चा केली असती तर ते शिष्टाचाराला धरून झाले असते. एखाद्या व्यक्तिवर तुम्ही चित्रपट काढू इच्छित असाल तर त्यापूर्वी त्याच्याशी वा त्याच्या कुटुंबाशी चर्चा करणे, त्यांना स्क्रिप्ट ऐकवणे, हा सामान्य शिष्टाचाराचा भाग आहे. जॉर्ज सार्वजनिक आयुष्य जगले. म्हणून त्यांच्या कामाबद्दल विचार मांडण्याचा लोकांना पूर्ण हक्क आहे. पण तेवढाच हक्क त्यांच्या कुुटुंबालाही आहे. कुटुंबाच्या परवानगीशिवाय हे बायोपिक साकारता कामा नये, असे त्यांनी म्हटले आहे.तथापि संजय राऊत यांना लैला यांचा हा युक्तिवाद फार मान्य नाही. मी जॉर्ज यांच्या कुटुंबाशी बोलेल. पण जॉर्ज साहेबांच्या सार्वजनिक आयुष्याबद्दल इतके काही ‘सार्वजनिक’ आहे की त्यांच्यावर बायोपिक बनवण्यासाठी कुटुंबाच्या परवानगीची गरज नाही, असे त्यांचे मत आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नसले तरी 'बंद' किंवा 'लीडर' या आशयाची नावे सुचविण्यात आली आहे. या बायोपिकची कथा व पटकथा तयार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.