अमेरिकन पोलिसांच्या अमानुषणाचा बळी ठरलेला जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तिच्या मृत्यूनंतर अमेरिकेत लोक रस्त्यावर उतरले आहेत. अमेरिकेत ठिकठिकाणी हिंसक आंदोलन सुरु आहे. फ्लॉयडच्या मृत्यूचा संबंध अमेरिकेतील वर्णद्वेषाशी जोडला जात आहे. जगभर या घटनेवर प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडही याला अपवाद नाही. प्रियंका चोप्रा, करिना कपूर, करण जोहर, दिशा पाटनी यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूचा निषेध करत आहेत. पण कंगना राणौत हिने मात्र जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूचा निषेध नोंदवणा-या या बॉलिवूड स्टार्सला चांगलेच सुनावले आहे. काही दिवसांपूर्वी साधूंची हत्या झाली, तेव्हा हे सेलेब्रिटी गप्प का होते? असा सवाल तिने केला आहे.
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत कंगना यावर बोलली. ‘अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूवर बोलत आहेत. पण पालघरमध्ये दोन साधूंचे बदडून बदडून ठार मारले गेले, तेव्हा यापैकी एकही जण एकही शब्द बोलला नाही. ही घटना महाराष्ट्रात घडली होती. बहुतांश बॉलिवूड सेलिब्रिटी महाराष्ट्रातच राहतात, तरीही ते गप्प राहिले. हे सगळे सेलिब्रिटी केवळ प्रसिद्धीसाठी वाहत्या गंगेत हात धुतात. अमेरिकेत हत्या झालेल्या व्यक्तिंबदद्दल गळा काढता, मग पालघरमध्ये निष्पाप साधूंची हत्या झाली, तेव्हा कुठे होतात’ असे कंगना म्हणाली.
ती इथेच थांबली नाही तर पर्यावणाच्या मुद्यावरही तिने बॉलिवूड सेलिब्रिटींना फैलावर घेतले. ‘पर्यावरणाच्या मुद्यावरही बॉलिवूड सेलिब्रिटी केवळ व्हाईट लोकांना पाठींबा देतात. आपल्या देशात असे अनेक लोक आहेत, जे पर्यावरणासाठी उत्तम काम करत आहेत. पण इंडस्ट्रीतील लोक त्यांना सपोर्ट करत नाहीत. कदाचित साधू आणि आदिवासी लोक बॉलिवूडवाल्यांसाठी तितके फॅन्सी नाहीत. त्यामुळे ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात,’असे ती म्हणाली.कंगना राणौत ही तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. याआधीही अनेक मुद्यांवर ती अशीच व्यक्त झाली आहे. यामुळे ती कायम चर्चेतही असते.