‘खजाना’ या गझल महोत्सवाचे १७वे पर्व मुंबईमध्ये २७ व २८ जुलै २०१८ रोजी नरीमन पॉईंट येथे आयोजित करण्यात आले आहे. ह्या महोत्सवाची घोषणा करण्यासाठी प्रख्यात गझल गायक पंकज उदास, अनुप जलोटा, तलत अझीझ, गायक सुदीप बॅनर्जी, बासरीवादक राकेश चौरसिया यांनी मुंबईत केली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गझलप्रेमींना भारतातील आघाडीच्या आणि नावाजलेल्या गझल गायकांना ऐकण्याची संधी या महोत्सवामध्ये मिळणार आहे.
‘खजाना–अ फेस्टिवल ऑफ गझल्स’ ही सतरा वर्षे जुनी अशी संकल्पना आहे आणि गझल गायकांना त्यांची सांगीतिक गुणवत्तेची पारख असलेल्या प्रेक्षकांसमोर व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने तिची सुरुवात झाली आहे. पंकज उदास म्हणाले, “खजाना’ची १७ वर्षे साजरी करताना आणि त्याची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. म्हणूनच १७व्या ‘खजाना गझल फेस्टिव्हल’ची ‘मुहब्बत’ ही संकल्पना आम्ही राबवीत आहोत. यातून प्रेमाच्या वैविध्यपूर्ण भावना व्यक्त होणार आहेत. मला पूर्ण खात्री आहे की यंदाही हा महोत्सव गतवर्षींप्रमाणेच अत्यंत यशस्वी ठरेल.”
थॅलेसेमिक मुले आणि कर्करोगाने ग्रस्त रुग्णांसाठी निधी संकलन करण्याच्या उद्दिष्टाने आयोजित करण्यात येत असलेल्या ‘खजाना’मध्ये गजलांचा अनोखा असा उत्सवच साजरा होतो. हा उपक्रम एवढी वर्षे अविरतपणे सुरु आहे, ही बाबसुद्धा अविश्वसनीय आहे. यावेळी एक थोडीसी अनोखी अशी एक गोष्ट घडली आहे. ती म्हणजे ‘खजाना आटीस्ट अलाऊड टॅलेंट हंट’ या भारतातील पहिल्या वहिल्या गझल गायकांची शोध स्पर्धा घेण्यात आली. भारतातील ७५ शहरांमधून भव्य प्रमाणावर स्पर्धक सहभागी झाले होते. मुंबई ते प्रतापगड, दिल्ली ते विदिशा आणि बेंगळूरू ते सीतामढी या देशाच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धकांचे परीक्षण ख्यातनाम अशा परीक्षकांच्या चमूने केले. त्यांमध्ये पंकज उदास, रेखा भारद्वाज, तलत अझीझ, अनुप जलोटा आणि सुदीप बॅनर्जी यांचा समावेश होता. स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. यातील दोन विजेत्या कलाकारांना बहुप्रतीक्षित अशा ‘खजाना गझल महोत्सवा’मध्ये गाण्याची संधी मिळणार आहे.
यंदाच्या ‘खजाना’मध्ये बहुप्रतिभावान अशा कलाकारांची अदाकारी ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. पंकज उदास, अनुप जलोटा, तलत अझीझ, रेखा भारद्वाज, रिचा शर्मा, सुदीप बॅनर्जी आपली कला सादर करणार आहेत. त्याशिवाय कौशिकी चक्रवर्ती, राकेश चौरासिया, पुर्यबान चॅटर्जी, दीपक पंडित आणि ओजस अधिया यांनी संयोजन केलेली अनोख्या गझलाही सादर होणार आहेत.