हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या #MeTooचं वादळ आलं आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर छेडछाडीचे आरोप केल्यानंतर चित्रपटसृष्टीत दररोज असे नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. विकास बहल, आलोकनाथ, सलमान खानसह चित्रपटसृष्टीतील बड्या सेलिब्रिटींबाबत असे खुलासे होत आहेत. #MeToo अंतर्गत दररोज एक नव्या आरोपांनी हिंदी चित्रपटसृष्टीला हादरे बसत आहेत. याच पार्श्वभूमीवर विविध सेलिब्रिटींच्या या मुद्यावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रसारमाध्यमं उत्सुक आहेत.
मीटू या चळवळीबाबत हिंदी चित्रपटसृष्टीचा मुन्नाभाई अर्थात अभिनेता संजय दत्त याचं मत जाणून घेण्याचा माध्यमांनी प्रयत्न केला. या मोहिमेमुळे तुला भीती तर वाटत नाही ना असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी संजय दत्तला विचारला. मात्र #MeTooबाबत हा प्रश्न विचारताच मुन्नाभाई चांगलाच संतापला. या प्रश्नावर त्याचा पारा असा काही चढला की त्याने प्रश्न विचारणाऱ्या माध्यम प्रतिनिधीलाच प्रतिप्रश्न केला.
“जा, माझ्या त्या 308 गर्लफ्रेंड्सना याबाबत विचारा, ज्यांच्यासोबत माझं अफेअर होते, ज्यांच्यासोबत मी अनेकदा झोपलो त्यांना विचारल्यास तुम्हाला कळेल की मी माणूस म्हणून कसा होतो?” असा प्रतिप्रश्न संजूबाबाने केला. आपण कुणासोबत कधीही जबरदस्ती केली नाही किंवा जिच्याशी सहमती होती तिला सोडलं नाही अशी कबूली त्याने दिली. यानंतर कोणतीही प्रतिक्रिया न देता संजूबाबाने तिथून काढता पाय घेतला.
यानंतर संजय दत्तला भेटण्यासाठी दबंग खान सलमान तिथे पोहचला. यावेळी दोघांमध्ये मीटू या मोहिमेबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. जवळपास दोन तासांहून अधिक काळ दोघं या विषयावर बोलत असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय चित्रपटसृष्टीतील बडे सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध निर्माते आपापल्या वकीलांसह या विषयावर सल्लामसलत करत असल्याचे बोललं जात आहे. दुसरीकडे #MeToo संदर्भात आजवर जे काही खुलासे झालेत ते फक्त हिमनगाचे टोक असल्याचे बोललं जात आहे. हे खुलासे म्हणजे फक्त 1 टक्के इतकेच आहेत. जर सगळ्या अभिनेत्रींनी पोलीस तक्रारी दाखल करण्यास सुरूवात केली तर निम्म्याहून अधिक चित्रपटसृष्टी कारागृहात असेल असं मत चित्रपटसृष्टीतील जाणकार व्यक्त करत आहेत.