‘पद्मावत’ला कुठल्या संघटनेने नव्हे तर गोवा पोलिसांनीच केला विरोध, राज्य सरकारला लिहिले पत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 5:05 PM
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दाखविला असला तरी, चित्रपटाला होत असलेला विरोध कायम आहे. ...
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दाखविला असला तरी, चित्रपटाला होत असलेला विरोध कायम आहे. सुरुवातीपासून ‘पद्मावती’ला होत असलेला विरोध लक्षात घेता सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या नावात बदल करीत काही सीन्सला कात्री लावली. सेन्सॉरच्या सुधारणेनुसार चित्रपटाचे ‘पद्मावती’ हे नाव बदलून ‘पद्मावत’ असे करण्यात आले; परंतु अशातही चित्रपटाला विरोध कायम आहे. आता गोव्यातून विरोधाचा सूर समोर आला असून, चित्रपटावर बंदी घातली जावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, सुरुवातीला राजस्थान त्यानंतर हिमाचल प्रदेश या दोन राज्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केल्यानंतर गोव्यातही असाच काहीसा सूर समोर आला आहे. मात्र हा विरोध कुठल्या संघटनेने केला तर खुद्द गोवा पोलिसांनीच केला आहे. विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून गोवा पोलिसांनी राज्य शासनाला एक पत्रही लिहिले आहे. पोलिसांनी पत्रात लिहिले की, ‘राज्यात ‘पद्मावत’ प्रदर्शित झाल्यास राज्यातील पोलीस यंत्रणेवर ताण वाढेल, त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्याविषयी राज्य सरकारने विचार करावा.’ दरम्यान, गोव्यात भाजपा सरकार असल्याने, ही सरकारचीच खेळी नसावी ना? असा सूर इंडस्ट्रीत व्यक्त केला जात आहे. कारण भाजपाशासित प्रदेशांमध्येच ‘पद्मावत’ला विरोध होताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण, शाहिद कपूर, रणवीर सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या शूटिंगपासूनच चित्रपटाला सातत्याने विरोध होताना दिसत आहे. त्यामुळे चित्रपट सुरळीत प्रदर्शित करणे हे प्रत्येक राज्यात जोखमीचे झाले आहे.