मुरली शर्माने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. गोलमाल या चित्रपटांच्या सीरिजमधील त्याच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले आहे. त्याने बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांसोबत काम केले असून शाहरुख खान सोबत मैं हू ना, सलमान खान सोबत दबंग या चित्रपटात तो झळकला आहे. प्रभासच्या साहो या काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात देखील तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्याने हिंदीसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
मुरलीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तो मीडियापासून दूर राहाणेच पंसत करतो. पण आज मुरली शर्माच्या खाजगी आयुष्याविषयी आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. मुरली शर्माचे लग्न एका अभिनेत्रीसोबत झाले असून या अभिनेत्रीने मराठीसोबतच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तसेच ती छोट्या पडद्यावर देखील झळकली आहे.
अश्विनी कळसेकरने मराठी चित्रपटांद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मराठी मालिकांमध्ये देखील काम केले. त्यानंतर तिला शांती या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली. पण तिला खऱ्या अर्थाने ओळख सीआयडी या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेनंतर तिने कसम से या मालिकेत काम केले. या मालिकेत तिने साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या मालिकेसाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. तिने मालिकांप्रमाणेच मुसाफिर, अपहरण, फूंक, गोलमाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अश्विनी कळसेकर आणि मुरली शर्मा यांनी 2009 मध्ये लग्न केले. त्यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. पण अश्विनीचे पहिले लग्न नितेश पांडे या अभिनेत्यासोबत झाले होते. त्याने साया, एक रिश्ता साझेदारी का या मालिकांमध्ये तर ओम शांती ओम या चित्रपटात काम केले आहे. त्या दोघांचे 1998 मध्ये लग्न झाले होते. पण लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आणि नितेशने अभिनेत्री अर्पिता पांडेसोबत लग्न केले. नितेश आणि अर्पिताच्या प्रेमप्रकरणामुळे त्यांचा घटस्फोट झाला असे म्हटले जाते. पण यावर नितेश आणि अश्विनी यांनी नेहमीच न बोलणेच पसंत केले. घटस्फोटानंतर काही वर्षांनी मुरली तिच्या आयुष्यात आला. त्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर लग्नात झाले.