प्रसिद्ध कवियत्री अमृता प्रीतम यांच्या 100 व्या जन्मदिनाच्या निमित्ताने गुगलने त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्याच्यावर एक खास डुडल बनवण्यात आले असून या डुडलमध्ये कविता लिहिताना एका स्त्रीला रेखाटण्यात आले आहे. त्यांच्या फॅन्सना हे डुडल प्रचंड आवडत आहे.
अमृता प्रीतम या प्रसिद्ध पंजाबी कवियत्री असून त्यांनी सर्वच भाषांवर आपली एक छाप सोडली होती. साहित्यिक असलेल्या अमृता यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात देखील आले होते. अमृता प्रीतम यांचा जन्म 31 ऑगस्ट 1919 ला पाकिस्तानामधील पंजाब प्रांतातील गुजरांवाला या शहरात झाला होता. वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांचे लग्न करण्यात आले होते. त्यांचे पहिले पुस्तक देखील वयाच्या सोळाव्या वर्षीच प्रसिद्ध झाले होते. त्यांचे लग्न त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या प्रीतमसिंह यांच्यासोबत करण्यात आले होते. त्यांचे पती हे व्यसनी होते. त्यामुळे त्यांना सांसारिक सुख कधीच मिळाले नाही. याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात साहिर लुधियानवी आले. त्यांचे साहिर यांच्यावर अतिशय प्रेम होते. अमृता लाहोर मध्ये असताना त्यांच्या अनेकवेळा साहिर यांच्यासोबत भेटीगाठी व्हायच्या. काही वर्षांनंतर साहिर बॉलिवूडमध्ये करियर करण्यासाठी मुंबईत आले आणि ते तिथेच राहिले. त्यांनी एक गीतकार म्हणून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. त्या काळात केवळ पत्रांद्वारे त्यांच्यात संपर्क होता. त्याच दरम्यान अमृता प्रीतम यांची ओळख चित्रकार इमरोजशी यांच्याशी झाली आणि काहीच वर्षांत त्यांची चांगली मैत्री झाली. त्या दोघांनी नात्याला कोणतेही नाव न देता 40 वर्षं एकत्र घालवली.
अमृता प्रीतम यांचे रसीदी टिकट हे आत्मचरित्र चांगलेच गाजले होते. याचा विविध भाषांमध्ये अनुवाद देखील करण्यात आला होता. साहित्य अकदामीचा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिला महिला कवियत्री होत्या. त्यांनी 100 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.