पूर्वी एखाद्या नव्या जागेवर आपल्याला जायचे असल्यास आपल्याला गाडीतून अनेकवेळा उतरून लोकांना पत्ता विचारावा लागत असे. पण आता गुगल मॅपमुळे आपल्याला रस्ते शोधणे अधिक सोपे झाले आहे. केवळ ओळखीच्या नव्हे तर अनोळखी शहरात देखील गुगल मॅपमुळे आपल्याला अतिशय सहजपणे प्रवास करता येतो. गुगल मॅपवर आपल्याला एका मुलीचा आवाज ऐकायला मिळतो. ती आपल्याला कोणत्या रस्त्याने जायचे हे सांगत असते. पण हाच आवाज बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा असेल, अमिताभ बच्चन तुम्हाला रस्ते सांगतील तर तो प्रवास किती चांगला होईल. हो, आता अमिताभ बच्चन गुगल मॅपसाठी त्यांचा आवाज देणार आहेत.
मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार, गुगल आता गुगल मॅपसाठी अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचा वापर करणार आहे. याबाबत सध्या गुगलचे प्रवक्ते आणि अमिताभ बच्चन यांच्यात चर्चा सुरू आहे. सध्या आपल्याला गुगल मॅपवर न्यूयॉर्कमध्ये राहाणाऱ्या कॅरन जॅक्सनचा आवाज ऐकायला मिळतो. पण भारतात अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यामुळे अमिताभ यांनी गुगल मॅपसाठी आवाज द्यावा अशी या कंपनीच्या मंडळींची इच्छा आहे.
सध्या भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे सगळीकडे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन घरातूनच त्यांचा आवाज गुगल मॅपसाठी रेकॉर्ड करतील अशी देखील चर्चा रंगली आहे. पण अमिताभ गुगल मॅपचा आवाज बनणार याची जोरदार चर्चा असली तरी गुगल आणि अमिताभ यांच्यात अद्याप तरी कोणतीही डील साईन झाली नसल्याचे म्हटले जात आहे.