अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमध्ये गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. अमिताभ यांच्या वयाची ८० वर्ष ओलांडली तरी आजही ते विविध सिनेमांमधून प्रेक्षकांंचं मनोरंजन करत आहेत. अमिताभ यांचे जगभरात हजारो फॅन्स आहेत. गेली अनेक वर्ष हे चाहते बिग बींवर मनापासून प्रेम करत आहेत. अमिताभ यांच्या अशाच एका फॅनने घराबाहेर त्यांचा पुतळा उभारलाय. विशेष म्हणजे हा पुतळा आता एक पर्यटन स्थळ बनलाय. जाणून घ्या सविस्तर.
न्यू जर्सीच्या चाहत्याने उभारला बिग बींचा पुतळा
न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन शहरापासून ३५ किलोमीटरवर गोपी सेठ यांचे घर आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये गोपी यांनी घराबाहेर अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारलाय. हा पुतळा आता टूरिस्टसाठी प्रमुख आकर्षणाचं केंद्र बनलाय. इतकंच नव्हे तर गूगलनेही या जागेला मान्यता दिली आहे. अमिताभ यांचा हा पुतळा पाहण्यासाठी जगभरातून लोकांची इथे गर्दी होते. याविषयी गोपी सेठने व्हिडीओ शेअर केलाय आणि लिहिलंय की, "अमिताभ बच्चन जे माझे आदर्श आहेत त्यांचा न्यू जर्सीमधील पुतळा एक आकर्षण बनला आहे. महान अभिनेत्याप्रती माझा आदर व्यक्त करण्यासाठी ही माझी खास कृती आहे."
त्या पुतळ्यामुळे माझं घर एक टूरिस्ट स्पॉट: गोपी सेठ
गोपी सेठ यांनी पुढे सांगितलं की, "अमिताभ बच्चन यांच्या पुतळ्यामुळे माझं घर एक पर्यटन स्थळ झालंय. गूगल सर्चद्वारे या जागेला मान्यता मिळाल्याने दररोज इथे येणाऱ्या चाहत्यांची संख्या वाढत आहे. जगभरातले फॅन्स इथे येऊन अमिताभ यांच्यासाठी पत्र आणि ग्रिटींग ठेवतात. दररोज २० ते २५ कुटुंब हा पुतळा पाहण्यासाठी येतात." अमिताभ यांचे डाय हार्ड फॅन असलेले गोपी हा पुतळा उभारल्याने चर्चेत आले आहेत.