नवी दिल्ली-
बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यात वितुष्ट असल्याचं जगजाहीर आहे. बऱ्याच काळापासून दोघांमध्ये विस्तव जात नाही. याबाबत कृष्णा अभिषेक यालाही अनेकदा मामा गोविंदासोबतच्या वादावर भाष्य करताना पाहिलं आहे. कृष्णा आणि त्याची बहिण आरती सिंह हिनं एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की कठिण काळात गोविंदानं त्यांची मदत केली होती. गोविंदा दरमहा २ हजार रुपये देत असे. पण गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता यांना कृष्णा व आरतीनं ते जगजाहीर करणं आवडलं नव्हतं. आता याप्रकरणावर गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता यांनी मनमोकळेपणानं भाष्य केलं आहे.
एका नव्या मुलाखतीत गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा यांनी कृष्णा अभिषेक आणि त्याची बहिण आरतीनं केलेल्या विधानांवर नाराजी व्यक्त केली. या गोष्टींचा आपल्याला आता खूप त्रास होतो असं सुनिता म्हणाल्या, तर कौटुंबिक गोष्टी सार्वजनिकरित्या बोलणं योग्य नाही, असं गोविंदा म्हणाला.
'बॉलीवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत गोविंदा आणि सुनिता यांना कृष्णा अभिषेकबाबत प्रश्न विचारला गेला असता सुनिता चांगल्याच संतापल्या. "त्यांच्याबाबत कोणताही प्रश्न विचारू नका. त्यांनी तुम्हाला दिलेल्या मुलाखतीत जे काही सांगितलं आहे ते सत्य नाही. यामुळेच मला त्याचा जास्त त्रास होत आहे. गोविंदा देखील आता त्यांना काहीच बोलणार नाहीत", असं सुनिता म्हणाल्या.
"मला आता खरंतर खूप पश्चाताप होत आहे की आपण यांची देखभाल कशासाठी केलीय. गोविंदानं फक्त २ हजार रुपये दिले असं खोटं त्यांनी का म्हटलं. ते लोक जेव्हा असं खोटं काहीतरी सांगतात तेव्हा ते तुम्हाला योग्य वाटतं का", असं सुनिता गोविंदाला म्हणाल्या. ते दोघं मनिष पॉलच्या शोमध्येही गेले. जर मीडियासमोर विधान करताना ते कोणतीही काळजी घेत नाहीत. तर मग याचा तुम्ही त्रास का करुन घेता हे मला समजत नाही, असंही सुनिता गोविंदाला म्हणाल्या.
पत्नी सुनिताच्या वक्तव्यावर गोविंदा म्हणाला...गोविंदानं आपलं म्हणणं मांडताना कौटुंबिक गोष्टी सार्वजनिक पातळीवर बोलू नयेत किंवा ते मला आवडत नाही, असं म्हटलं. "त्यावेळी सारंकाही आई ठरवत असे. आता मला या गोष्टी अजिबात माहित नाहीत की जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांना नेमकी कोणती कहाणी सांगितली गेलीय. जेव्हा तुम्ही इतरांची जास्त काळजी घेऊ लागता तेव्हा त्याचं क्रेडिट दुसरे लोक घेऊ लागतात. पण जो सारंकाही करत असतो त्याला असं वाटत असतं की आपण दुसऱ्याचं भलं करत आहोत. त्याचे वडील एक माणूस म्हणून खूप चांगले व्यक्ती होते आणि त्याची आई माझी सर्वात लाडकी बहिण होती. त्यामुळे त्यांच्यासोबत कोणताही वाद मी घालू इच्छित नाही. जर तुम्ही माझ्याबाबत चांगली गोष्ट बोलू शकत नाही तर मी तुम्हाला धन्यवाद म्हणेन. कारण सत्य कधी ना कधी समोर येईलच", असं गोविंदा म्हणाला.